लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजकल्याण विभागातील कृषी अवजारे घोटाळ्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) घेतली असून याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणावर कुणालाच पांघरूण घालता येणार नसल्याची चर्चा आहे.
समाजकल्याण विभागामार्फत २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांसाठी कृषी अवजारे देण्याची योजना आखण्यात आली. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला होता. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. पुरवठादाराने साहित्यच दिले नाही. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले होते. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटांच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याची माहिती समोर आली.
काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे समोर आले. बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. सर्व जिल्हाभर हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. प्राथमिक चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. परंतु त्यावरच काहीच झाले नाही. दरम्यान, खासदार श्यामकुमार बर्वे यांनी या घोटाळ्याची तक्रार पंतप्रधानांकडे केली. त्यानंतर पीएमओ कार्यालयाने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.