काेराडी : वीज क्षेत्रात कार्यरत सर्व कर्मचारी, अधिकारी व अभियंता यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदाेलन शनिवारीदेखील सुरूच हाेते. काेराडी वीजनिर्मिती केंद्रातील सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगार या कामबंद आंदाेलनात सहभागी झाले आहेत.
सर्व संघटनांचा समावेश असलेल्या वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाला कंत्राटी कामगारांच्या संघटनांनी आपला पाठिंबा दिला आहे. कोराडी येथील वीज केंद्रात हे सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंते, कंत्राटी कामगार कामावर उपस्थित राहतात, परंतु काम न करण्याचे त्यांनी ठरविले आहे. असे असले तरी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये व वीजनिर्मिती प्रभावित होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. वीजनिर्मिती प्रभावित होणार नाही व त्यासाठी आवश्यक असलेली कामे हे कामगार काळ्या फिती लावून करीत आहेत. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नसून, हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
कोराडी येथील कृती समितीच्या वतीने गजानन सुपे, विलास भालेराव, राजेश गोरले, विशाल लोंढे व दायमा आदी कामगार नेत्यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे, विविध कंत्राटी कामगारांच्या संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. वीज क्षेत्रात काम करणाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या, या प्रमुख मागणीसह यांच्या कुटुंबीयांना प्राधान्यक्रमाने कोविड लसीकरण करण्यात यावे, काेराेनामुळे मृत पावलेल्या कामगारांना शासनाने ५० लाख रुपये अनुदान द्यावे, तिन्ही कंपन्यांमध्ये टीपीएची तत्काळ नेमणूक करावी, वीज बिल वसुलीसाठी सक्ती करू नये, आदी मागण्याही त्यांनी केल्या आहेत. मागण्यांचे निवेदन सर्व वरिष्ठांना दिले असून, वरिष्ठांनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचे संकेत कामगारांनी दिले आहेत.