विश्वशांतीचे सामर्थ्य फक्त भारतात; प्रल्हाद पै यांचे भावोद्गार, विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 09:55 AM2023-10-22T09:55:41+5:302023-10-22T09:57:23+5:30

जीवनविद्या मिशनच्या ‘कालदर्शिका’ व डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या ‘दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

power of world peace only in india said pralhad pai | विश्वशांतीचे सामर्थ्य फक्त भारतात; प्रल्हाद पै यांचे भावोद्गार, विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ

विश्वशांतीचे सामर्थ्य फक्त भारतात; प्रल्हाद पै यांचे भावोद्गार, विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जगात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना केवळ भारतच मांडू शकला आहे. कारण भारतीय संस्कृतीने जेवढे तत्त्वज्ञान विकसित केले आहे, तेवढे पाश्चात्त्य देशात नाही.  विश्वाचे कल्याण, विश्वशांती हीच आपली संस्कृती  असल्याने जगात  केवळ भारतच विश्वात शांती घडवू शकतो, असे भावोद्गार जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै यांनी काढले.

जीवनविद्या मिशनतर्फे सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृहात केले होते. मार्गदर्शक म्हणून जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा उपस्थित होते. 

यावेळी जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष जयंत जोशी व जीवनविद्या फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन उपस्थित होते. यावेळी सद्गुरू वामनराव पै यांनी विश्वाच्या कल्याणाकरिता रचलेल्या विश्वप्रार्थनेचा जपयज्ञ करण्यात आला. त्याचबरोबर जीवनविद्या मिशनच्या ‘कालदर्शिका’ व डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या ‘दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सद्गुरूंनी दाखविला सुखमय जगण्याचा मार्ग- गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सद्गुरू वामनराव पै यांच्याबद्दल म्हणाले की, त्यांनी सुखमय जीवन कसे जगता येईल, हे सामान्य माणसाला, सामान्य भाषेत समजावून सांगितले. त्यांनी विश्वशांतीसाठी जी विश्वप्रार्थना रचली तो मानवतेचा विचार आहे. समाजाचे निर्माण व विश्वाच्या कल्याणाचे कार्य हे जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून सुरू आहे. हे कार्य एकप्रकारचा महायज्ञ आहे.

भगवान महावीरांचे कार्य जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून घडतेय - डॉ. दर्डा

-याप्रसंगी डॉ. विजय दर्डा यांचा प्रल्हाद पै यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. दर्डा म्हणाले की, जग हिंसेच्या वेदना अनुभवतो आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धात प्रेम आणि क्षमाची गरज आहे. भगवान महावीरांनी आपल्या जीवनकार्यात प्रेम आणि क्षमा यावरच जोर दिला. भगवान महावीरांचे कार्य जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून सद्गुरू वामनराव पै यांच्यानंतर प्रल्हाद पै करीत आहेत. जीवन विद्या मिशन हे सक्षम पिढी घडविणारे कुटुंब आहे. सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिशनने विश्वाच्या शांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ करण्यासाठी नागपूरची निवड केल्याबद्दल डॉ. दर्डा यांनी त्यांचे आभार मानले.


 

Web Title: power of world peace only in india said pralhad pai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.