अरुण महाजन
खापरखेडा : भाजपला शह देण्यासाठी ग्रा. पं. निवडणुका एकसंध लढण्याचा संकल्प महाविकास आघाडीने केला आहे. मात्र, सावनेर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पोटा (चनकापूर) ग्रा. पं. निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं समर्थित नगरविकास परिवर्तन आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडी यांच्यात दुहेरी सामना रंगणार आहे. यासोबतच नाराजांनी काही वाॅर्डांत वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे यावेळी पोटा ग्रा.पं.च्या निवडणुकीत नव्या समीकरणाचा तोटा (नुकसान) आणि फायदा कुणाला होतो. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पोटा ग्रा.पं.च्या १७ जागांसाठी ६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील १५ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तब्बल ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात २६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पोटा ग्रामपंचायतीमध्ये एकूण ६ वॉर्ड मोडतात. वॉर्ड क्रमांक ३ येथून २ सदस्य, तर उर्वरित सर्व वॉर्डातून प्रत्येकी ३ सदस्यांची मतदारांना निवड करावयाची आहे. ग्रा. पं. कार्यालयाचा परिसर असलेल्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक १५ उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. यात १० महिला उमेदवारांचा समावेश आहे.
वॉर्ड क्रमांक १ मधून काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित गटाच्या माजी सरपंच वंदना ढगे यांना शह देण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं समर्थित गटाच्या शीतल गोस्वामी रिंगणात उतरल्या आहेत. शीतल गोस्वामी यांचे पती नितीन गोस्वामी यांनी गतवेळी वंदना ढगे यांच्यासोबत रिपाइं-भाजप समार्थित पॅनलमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत रिपाइं-भाजप समर्थित गटाचे ८, काँग्रेस समर्थित गटाचे ८, तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.
त्यावेळी अपक्ष उमेदवाराने रिपाइं-भाजपला समर्थन देऊन उपसरपंच पद मिळविले होते. सरपंच पद मिळविल्यानंतर वंदना ढगे यांनी गावाच्या विकासाचा मुद्दा पुढे करीत रिपाइं-भाजप गटाला रामराम करीत काँग्रेस गटात प्रवेश केला होता. माजी सदस्य विनोद कोथरे हे वॉर्ड क्रमांक १, विश्वजित सिंग हे वॉर्ड क्रमांक २, तर माजी सदस्या शिल्पा बनसोड यावेळी वॉर्ड क्रमांक २ मधून नशीब आजमावित आहेत. वॉर्ड क्रमांक ३ मधून माजी उपसरपंच अनिल छाणीकर, वॉर्ड क्रमांक ४ मधून रंजना कामळे, आशा भरद्वाराज आणि वॉर्ड क्रमांक ४ मधून माजी सदस्य राजेंद्र इंगोले रिंगणात उतरले आहेत. वॉर्ड क्रमांक ५ मधून माजी सदस्य नरेश खापरे, माजी सदस्य शशिकला खापरे, तर वॉर्ड क्रमांक ६ मधून माजी सरपंच संजय मिरचे, माजी सदस्य लीलाधर येकरे रिंगणात आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या ग्रा.पं.क्षेत्रात काॅंग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. यात काॅंग्रेसने बाजी मारली. पोटा ग्रा .पं. साठी विद्यमान जि. प. सदस्य प्रकाश खापरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वॉर्ड क्रमांक १,३,५, आणि ६ मध्ये काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. याचा फटका कुणाला बसतो याकडे लक्ष लागले आहे.
अशी आहे पोटा ग्रा. पं.
पोटा ग्रामपंचायत परिसर हा पोटा वस्ती, वेकोली कॉलनी आणि चनकापूर अशा तीन भागांत विभागला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही मोठी ग्रामपंचायत आहे. कोलार नदीच्या तीरापासून, तर कन्हान नदीच्या तीरापर्यंत या ग्रामपंचायत हद्दीचा विस्तार आहे.
एकूण वाॅर्ड - ०६
एकूण सदस्य - १७
एकूण मतदार - ११,५५४
पुरुष मतदार - ६०२०
स्त्री मतदार - ५५३४