लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील एक नव्हे तर तीन नेत्यांना पक्षात परत घेण्यात आले. त्यांना पदेही देण्यात आली. मग हाच न्याय नरेंद्र जिचकार व चंद्रपाल चौकसे यांना का नाही, असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राजेंद्र मुळक हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतानाही त्यांनी रामटेक मतदारसंघात बंडखोरी केली. पक्षाने त्यांना निलंबित केले. जिल्हाध्यक्षपदही काढून घेतले. याज्ञवल्क्य जिचकार यांनी काटोल मतदारसंघात अपक्ष म्हणून दंड थोपटले.
तर काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांनी मध्य नागपुरातील काँग्रेस उमेदवार अ.भा. युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. असे असतानाही या तीनही नेत्यांचे टप्प्याटप्प्याने निलंबन रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे नव्या प्रदेश कार्यकारिणीत मुळक यांना वरिष्ठ उपाध्यक्ष तर याज्ञवल्क्य यांना महासचिवपद देण्यात आले.
रामटेक मतदारसंघात चंद्रपाल चौकसे यांनी तर पश्चिम नागपूर मतदारसंघात नरेंद्र जिचकार यांनी बंडखोरी केली होती. या दोन्ही नेत्यांना देखील पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, मुळक, यज्ञवल्क्य व पुणेकर यांचे निलंबन रद्द करीत असताना या दोन नेत्यांचे निलंबन मागे घेण्याबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न त्यांचे समर्थक उपस्थित करीत आहेत.
नवखे महासचिव, ३० वर्ष झिजणारे सचिवकाँग्रेसच्या राजकारणात गॉडफादर असल्याशिवाय काही खरे नाही, असे म्हटले जाते. त्याची प्रचिती काही अंशी प्रदेश काँग्रेसची यादी पाहता येते. राजकारणात चार-पाच वर्षांपूर्वी सक्रिय झालेल्या काहींना महासचिव पद मिळाले आहे. काहींची 'अनुकंपा' तत्त्वावर वर्णी लागली आहे. तर २५ ते ३० वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून झिजणाऱ्यांना सचिव पदावर समाधान मानावे लागले आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेबद्दल आश्चर्यनवे प्रदेशाध्यक्ष हे राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' या तत्वावर विश्वास ठेवणारे आहेत. मग त्यांनी भेदभाव न करता सर्वांना समान निकष लावून न्याय देणे आवश्यक आहे. पण या प्रकरणात तसे होताना दिसत नाही, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.