नागपूर : सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने अंधाराचा फायदा घेत महिलेसोबत अश्लील वर्तणूक करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला घेऊन रुग्णालय प्रशासन हादरले असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणारे सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील सोयींच्या अभावाने शेवटची घरघर लागली आहे. गुंतागुंतीच्या प्रसुतीच्या शस्त्रक्रिया ते मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मेडिकल किंवा खासगी रुग्णालयांची रुग्णांना वाट धरावी लागत आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांपासून ते चतुर्थ श्रेणी पदांपर्यत ५५ टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णसेवा प्रभावित झाली असताना आता कर्मचाऱ्याच्या गैरवर्तणुकीमूळे सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्र. १ मध्ये एक पुरुष रुग्ण गेल्या आठवड्यापासून उपचारासाठी भरती झाला होता. त्याची शुश्रूषा करण्यासाठी त्याची पत्नी सोबत होती. शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वॉर्डातील दिवे बंद करून ‘नाईट लॅम्प’ लावण्यात आले होते. वॉर्डात अंधार होता. याचा फायदा घेत चार महिन्यापूर्वीच रुजू झालेला एक कर्मचारी ११.३० वाजताच्यादरम्यान दारू पिऊन आला. त्याने त्या रुग्णाच्या पत्नीशी अश्लील वर्तणूक करण्याचा प्रयत्न करताच ती महिला जोरजोराने ओरडायला लागली. लागलीच आजूबाजूच्या रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याला पकडले. यावेळी उपस्थित डॉक्टर आणि परिचारिकांंनी याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांना दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच दोन पोलीस रात्री १२ वाजता रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली. परंतु, रुग्ण कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. यामुळे, खरंच अश्लील वर्तन झाले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच तात्पुरती कारवाई म्हणून कर्मचाऱ्याला दोन दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचनाही अधीक्षकांनी दिल्याचे कळते. (प्रतिनिधी)
कामगार रुग्णालयात महिलेशी अश्लील वर्तन
By admin | Updated: February 14, 2016 03:08 IST