लोकांचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळण्यासाठी राजकारणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:28 AM2019-09-07T11:28:57+5:302019-09-07T11:29:28+5:30

निर्मल अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी काँग्रेसला उमेदवारी मागितली असून न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्यावर ते ठाम आहेत.

In politics to empower people to solve their problems | लोकांचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळण्यासाठी राजकारणात

लोकांचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळण्यासाठी राजकारणात

Next
ठळक मुद्देकाँग्रेसने तिकीट न दिल्यास अपक्ष लढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निर्मल अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी निर्मल समूहाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोजगार, स्वयंरोजगार यासारख्या विषयांवर काम करताना नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. समाजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करीत असताना या मोहिमेला अधिक बळ मिळण्यासाठी त्यांनी आता राजकारणाची कास धरली आहे. काँग्रेसला उमेदवारी मागितली असून न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्यावर ते ठाम आहेत.

प्रश्न : पतसंस्था, बँक, टेक्सटाईल यासह सामाजिक क्षेत्रात आपले काम कसे सुरू आहे.
मानमोडे : गेली ३० वर्षे अथक परिश्रम करून आपण संस्था, संघटना, उद्योग उभे केले आहेत. निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅप. सोसायटी, निर्मल अर्बन को-ऑप बँक, निर्मल बाजार, निर्मल नगरी, निर्मल हेल्थ केअर सेंटर, निर्मल जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंगच्या माध्यमातून आपण अनेक कुटुंबांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. निर्मल परिवारच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. निर्मल टेक्सटाईल्समध्ये गेल्यावर्षी ७५० लोकांना नोकरी दिली. विदर्भात ६० हजार महिला बचत गट तयार केले व त्यापैकी दक्षिण नागपुरातील २५ ते ३० हजार महिलांना विविध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. महिला स्वयंरोजगाराकडे वळवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्न : संस्था, संघटनात्मक कामात आपले प्रस्थ असताना आपण राजकारणात का येऊ इच्छिता ?
मानमोडे : आज नावारूपाला आलेल्या आपल्या संस्था, संघटना या ३० वर्षांच्या परिश्रमाचे फळ आहे. अविरत सेवा, प्रामाणिकपणा, चिकाटी व लोकांचा विश्वास यातून हे सर्व उभे केले आहे. कुठल्याही सत्तेचे, राजकीय पाठबळ नसताना स्वबळावर हे उभारले आहे. याचा पाया अधिक मजबूत होऊन यातून लोककल्याण करता यावे यासाठी राजकारणाचा विचार डोक्यात आला आहे. राजकारणातून मला स्वत:साठी काहीही मिळवायचे नाही. तर सर्वकाही लोकांसाठी करायचे आहे. शिवाय २१ व्या शतकात समाजकारणाला राजकारणाची जोड आवश्यक झाली आहे.

प्रश्न : राजकारणातील आपला मुख्य अजेंडा व व्हिजन काय आहे ?
मानमोडे : रोजगार, आरोग्य व तांत्रिक शिक्षण ही आपल्या राजकीय जीवनातील त्रिसूत्री आहे. यालाच व्यापक स्वरूप देण्याचा आपला संकल्प आहे. ‘आधी पोट व नंतर व्होट’ हेच आपले ब्रीद आहे. युवक, महिला व सामान्य नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आधी मिटावा, त्यांना रोजगार मिळावा, चार पैसे मिळावे, त्यांचे घर व्यवस्थित चालावे, यालाच आपले प्राधान्य आहे. प्रत्येक हाताला काम मिंळून प्रत्येक घरातील चूल पेटली पाहिजे हाच आपल्या जीवनातील ध्यास आहे. रस्ते, गडरलाईन आदी विकास कामे तर होतच राहणार आहेत. पण आपण सर्वसामान्यांच्या वैयक्तिक हिताचे विषय घेऊन जनतेत जात आहोत.

प्रश्न : युवक व महिलांना रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आपल्या काय संकल्पना आहेत ?
मानमोडे : युवकांना तांत्रिक शिक्षण दिले तर ते त्या बळावर नोकरी करू शकतात, स्वयंरोजगारही करू शकतात. अशा युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास निर्मल परिवार कटिबद्ध आहे. आम्ही युवकांसाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. युवकांच्या कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. व्यवसाय कोणता करावा यासाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र देखील सुरू केले आहे. त्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. दक्षिण नागपुरात महिलांसाठी भव्य रेडिमेड गारमेंट हब उभारण्याचा आपला मानस आहे. यातून सुमारे १० ते १५ हजार महिलांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. त्यातून त्यांचे घर चालविण्यास मदत होईल.

प्रश्न : सामान्यांना माफक दरात व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आपला अ‍ॅक्शन प्लान काय आहे ?
मानमोडे : जनसामान्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आठ वर्षांपूर्वी आपण ‘निर्मल हेल्थ केअर सेंटर’ सुरू केले. पाच एम.डी. डॉक्टर तेथे सेवा देत आहेत. तेव्हा तर राजकारण हा विषयही डोक्यात नव्हता. रक्त चाचणी, एक्स-रे, सोनोग्राफी आदी सर्व वैद्यकीय चाचण्या येथे अर्ध्या पैशात उपलब्ध करून दिल्या जात आहे. दक्षिण नागपुरात सहा प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात वैद्यकीय तपासणीसाठी एक ओपीडी सुरू करण्याचा आपला मानस आहे. त्यामुळे गरिबांना माफक दरात आरोग्य सुविधा मिळेल. नागरिकांची गरज व मागणी विचारात घेता नागरिकांना घरपोच आरोग्य सेवा देण्यासाठी ‘मोबाईल आरोग्य व्हॅन’ सुरू करण्याची योजना आपण आखली आहे. दक्षिण नागपुरात असलेले मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, कॅन्सर हॉस्पीटलमध्ये जास्तीत जास्त सोयी सुविधा कशा उपलब्ध करून देतील येतील, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यासंबंधी सर्व सुविधा मोफत मिळाव्या यासाठी शासकीय योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.

प्रश्न : दक्षिण नागपूरशी आपला संबंध कसा व तेथील नागरिकांचे प्रश्न कसे हाताळणार ?
मानमोडे : दक्षिण नागपूरच्या मातीत माझा जन्म झाला. येथे खेळलो, वाढलो. याच मातीचा गंध विविध संस्थांच्या माध्यमातून आसमंतात दरवळतो आहे. माझी जडणघडण येथील लोकांनी प्रत्यक्ष पाहिली व अनुभवली आहे. मी एका चतुर्थ श्रेणी कर्मचाºयाचा मुलगा होतो. त्यामुळे गरिबी, सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे. त्या जाणिवेतूनच मी आधी काम करून दाखविले आहे. संधी मिळेल तर त्याला अधिक व्यापक स्वरूप देता येईल. नागरिकांचे विविध प्रश्न, अडचणी, तक्रारी असतात. त्या ऐकून घेऊन सोडविण्यासाठी निर्मल सोसायटीच्या प्रत्येक शाखेत तक्रार निवारण केंद्र सुरू केले जाईल. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन केला जाईल. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आपण घरोघरी जात आहोत. लोक समस्या सांगतात. त्या नोंदवून घेत आहोत. त्या नक्कीच सोडवू.

प्रश्न : आगामी विधानसभा निवडणुकीत आपली राजकीय वाटचाल कुठल्या दिशेने असेल ?
मानमोडे : दक्षिण नागपुरातून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय मी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव घेतला आहे. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मिळाली तर पक्षाचा आभारी राहील. नाही मिळाली तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. जनतेचा तसा आग्रह आहे.

Web Title: In politics to empower people to solve their problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.