पूर्व नागपूरच्या विकासकामांवरून खोपडे - वंजारींमध्ये पुन्हा कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 11:47 AM2022-08-24T11:47:09+5:302022-08-24T11:49:58+5:30

खोपडे म्हणतात, वंजारींनी भूमिपूजन केले, पण कामाचा पत्ता नाही; माझ्या विकासकामांनी खोपडे विचलित झाल्याचा वंजारींचा टोला

political war between in krushna Khopde and dr abhijeet Wanjari from East Nagpur development works | पूर्व नागपूरच्या विकासकामांवरून खोपडे - वंजारींमध्ये पुन्हा कलगीतुरा

पूर्व नागपूरच्या विकासकामांवरून खोपडे - वंजारींमध्ये पुन्हा कलगीतुरा

googlenewsNext

नागपूर : पूर्व नागपुरातील विकास कामांवरून भाजपचे आ. कृष्णा खोपडे व काँग्रेसचे आ. ॲड. अभिजित वंजारी यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. वंजारी यांनी सतरंजीपुरा भागात महिनाभरापूर्वी भूमिपूजन केले. मात्र, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे जनतेने अशा लबाड नेत्यांपासून सावध राहावे, अशा शब्दांत खोपडे यांनी वंजारींवर नेम साधला, तर

पूर्व नागपूर सतरंजीपुरा भागात बौद्धपुरा, किराडपुरा, तेलीपुरा या भागांत सिमेंट काँक्रीटचे फ्लोरिंग व अन्य कामांना आ. खोपडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सुरुवात झाली. यावेळी आ. खोपडे यांनी आ. वंजारी यांच्यावर थेट नेम साधला. आ. वंजारी यांनी महिनाभरापूर्वी माजी नगरसेवक नेताजी साकोरे यांच्या उपस्थितीत याच भागामध्ये भूमिपूजन केले; परंतु अद्याप कामाचा पत्ता नाही. कामाचे कार्यादेशही झालेले नाहीत. ‘लबाडाचे निमंत्रण’ अशा काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे विकासाच्या नावावर जनतेसोबत विश्वासघात करण्याची काँग्रेसची जुनी परंपरा आता उघड झाली आहे. वंजारी यांनी विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. जनतेने अशा लबाड नेत्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, अशी बोचरी टीकाही खोपडे यांनी यावेळी केली.

खोपडेंच्या टीकेबाबत वंजारी म्हणाले, खोपडे यांना दुसऱ्यांच्या कामाचा नेहमीच तिरस्कार वाटतो. दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सोमवारी क्वॉर्टर येथे माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या प्रयत्नातून नासुप्रने हॉल बांधला. त्यात देशातील काँग्रेसच्या राज्यसभेतील ९ खासदारांनी निधी दिला होता. त्याचेही श्रेय खोपडे यांनी घेण्याचा प्रयत्न केला. मी आमदार म्हणून आजवर ३१ कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यामुळे खोपडेंसारख्या आमदारांकडे दुर्लक्ष करतो. पूर्व नागपुरात माझ्या माध्यमातून विकासकामे होत आहेत. काँग्रेसने काढलेली आझादी गौरव यात्रा पूर्व नागपुरात सर्वांत मोठी निघाली. हा जनाधार पाहून खोपडे विचलित झालेले दिसतात. त्यामुळेच ते असे आरोप करीत असावेत, असा टोलाही वंजारी यांनी लगावला.

बेंचला पेंट मारण्यावरूनही रंगला होता वाद

पूर्व नागपुरात आपण लावलेल्या बेंच ला आ. वंजारी यांनी पेंट मारून स्वत:चे नाव लिहिल्याचा आरोपही काही दिवसांपूर्वी खोपडे यांनी केला होता. त्यावर आपण नवे बेंच लावण्यासाठी सक्षम असून, चिंधीचोरीची कामे करीत नाही, असा टोला वंजारी यांनी लगावला होता. या बेंचचा पेंट आता कुठे वाळला असताना पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय तू-तू मै-मै सुरू झाले आहे.

Web Title: political war between in krushna Khopde and dr abhijeet Wanjari from East Nagpur development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.