आंबेडकरी चळवळीतील शीलवंत मार्गदर्शक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:08 AM2021-04-17T04:08:49+5:302021-04-17T04:08:49+5:30

नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात आंबेडकरी चळवळीने अनेक विचारवंत, अभ्यासक, लढवय्ये कार्यकर्ते गमावले. अशात डॉ. कृष्णा कांबळे यांच्यासारख्या ज्येष्ठ ...

The polite guide of the Ambedkarite movement was lost | आंबेडकरी चळवळीतील शीलवंत मार्गदर्शक हरपला

आंबेडकरी चळवळीतील शीलवंत मार्गदर्शक हरपला

Next

नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात आंबेडकरी चळवळीने अनेक विचारवंत, अभ्यासक, लढवय्ये कार्यकर्ते गमावले. अशात डॉ. कृष्णा कांबळे यांच्यासारख्या ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्त्याचे जाणे ही चळवळीसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले असून समाजात शोक पसरला आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोकसंवेदना व्यक्त केल्या.

आंबेडकरी चळवळीचे नुकसान

डॉ. कृष्णा कांबळे यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर कांबळे कॅन्सरतज्ज्ञ होते. निवृत्तीनंतर त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलला विनामोबदला सेवा दिली. ते सामाजिक जाणिवेचे डॉक्टर होते. आंबेडकरी चळवळीत आणि बौद्ध धम्म कार्यात त्यांचा क्रियाशील सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी समाजाची खूप मोठी हानी झाली आहे.

- डॉ. जयंत जांभूळकर, अध्यक्ष,

फुले-आंबेडकर टीचर्स असोसिएशन

- गरिबांचा डॉक्टर हरविला

डॉ. कांबळे हे कॅन्सरतज्ज्ञ असतानाही त्यांनी स्वत:चे हॉस्पिटल न उभारता गरीब रुग्णांची निवृत्तीनंतरही सेवा केली. त्यांनी हजारो कॅन्सर रुग्णांना रोगमुक्त केले. वैद्यकीय सेवेशिवाय आंबेडकरी चळवळीतही मोठे योगदान दिले. नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन केंद्रात त्यांनी अंशदानात्मक शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविले. विद्यापीठाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या समाजनिष्ठ सेवेचा गौरव केला होता.

-डॉ. पुरणचंद्र मेश्राम, माजी कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

- बुद्धांची करुणा या देवमाणसाला कॅन्सर रुग्णात दिसायची

डॉ. कृष्णा कांबळे कॅन्सरतज्ज्ञ म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध होते. पैशासाठी या माणसाने नोकरी कधीच केली नाही. बुद्धाची करुणा या देवमाणसाला नेहमी कॅन्सर रुग्णात दिसायची.

ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक, प्रवर्तक, श्रीगुरूदेव युवामंच

- ते सामाजिक जाणिवेचे डॉक्टर होते

डॉ. कांबळे यांचे निधन झाले, यावर विश्वास बसत नाही. ते समाजिक जाणिवेचे डॉक्टर होते. आंबेडकरी चळवळीत आणि बौद्ध धम्म कार्यात त्यांचा क्रियाशील सहभाग होता. डॉ. आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांची नुकतीच डॉ. आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निधनामुळे सामाजिक हानी झाली.

प्रदीप आगलावे, माजी विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग

- मुक्तिवाहिनीतर्फे डॉ. कांबळे यांना श्रद्धांजली

सामाजिक आंदोलनातील एक सजग नेतृत्व, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कर्तृत्व, विद्याप्रेमी व्यक्तित्व, कर्करोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे यांचे परिनिर्वाण वेदनादायीच आहे. कर्करोगाच्या विळख्यातून अनेकांची सुटका करणारा डॉ. कृष्णा कांबळे नावाचा हा उमदा सरदार कोरोनाने स्मृतिशेष व्हावा हे क्लेशदायकच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य, मुक्तिवाहिनीचे ताराचंद्र खांडेकर, इ.मो. नारनवरे, का.रा. वालदेकर, नरेंद्र शेलार, डॉ. सुरेश मेश्राम, डॉ. धनराज डाहाट, दिलीप सूर्यवंशी, गोविंद वाघमारे, बबन चहांदे, डब्ल्यू. कपूर, डॉ. नीलकांत कुलसंगे, प्रा. हेमंत नागदिवे, प्रेमानंद गज्वी, कमल वाघधरे, नरेश वाहाणे, नरेश साखरे, सेवक लव्हात्रे आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

- अग्रेसर सैनिक गमावला

डॉ. कांबळे यांच्या अकाली निधनाने बुद्ध, फुले, आंबेडकरी चळवळीची भरून न निघणारी हानी झाली. प्रामाणिक, वैचारिक, कटिबद्ध, परोपकारी व अग्रेसर सैनिक गमावला.

बाळू घरडे, शहर अध्यक्ष, रिपाइं (आ.)

- आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का

आंबेडकरी चळवळीत आणि बौद्ध धम्म कार्यात त्यांचा क्रियाशील सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे मोठी सामाजिक हानी झाली आहे.

राजन वाघमारे, रिपाइं (आठवले)

- आंबेडकरी समाजाची मोठी हानी

आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व आंबेडकरी चळवळीचे नि:स्पृह हितचिंतक डॉ. कृष्णा कांबळे यांचे आज अकस्मात निधन झाले. डॉ. कृष्णा कांबळे यांचे निधन ही आंबेडकरी समाजाकरिता मोठी धक्कादायक बाब आहे.

- डॉ. शैलेंद्र लेंडे, विभागप्रमुख,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग,

- नि:स्पृह, निर्मोही व निगर्वी व्यक्तिमत्त्व

डॉ. कृष्णा कांबळे हे आंबेडकरी समाजातील एक अत्यंत नि:स्पृह, अतिशय निर्मोही आणि तितकेच निगर्वी असे व्यक्तिमत्त्व राहिलेले आहे. संपूर्ण आंबेडकरी समाजाला भूषण वाटावे अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. आजच्या काळामध्ये अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व अपवादात्मक स्वरूपाचे मानावे लागते. असे हे अपवादात्मक व्यक्तिमत्त्व आपल्यामधून निघून जाणे ही आपली फार मोठी सामाजिक हानी आहे.

- नरेश वाहणे, अध्यक्ष, रिपब्लिकन मुव्हमेंट

- ते सतत धम्मकार्य व समाजकार्य करीत राहिले

आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारकार्याचे देणे लागतो, ही भूमिका त्यांच्या मनामध्ये त्यांच्या तरुणपणाच्या काळापासून बसलेली होती. म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवाकार्याबरोबरच समाजसेवेच्या कार्यालादेखील आपल्या जीवनाचे ध्येय मानले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बुद्धिस्ट स्टडिज सेंटरमध्ये त्यांनी आपल्या निवृत्तीनंतर संशोधनाचे कार्य सुरू केले होते. आपले आयुष्य हे बुद्धधम्माच्या चळवळीला आणि आंबेडकरी समाजाच्या चळवळीला गतिमान करण्याकरता कामी लागले पाहिजे, अशी त्यांची भावना होती आणि त्या भावनेमधून ते सतत धम्मकार्य आणि समाजकार्य करीत राहिले.

- डॉ. अनिल हिरेखन, कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

- एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीवर एक अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची निवड केली होती. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. बाबासाहेबांचे ग्रंथ इंग्रजीत असल्यामुळे त्यांचे अनुवाद करून लवकरात लवकर ग्रंथ प्रकाशित व्हावे यासाठी ते प्रयत्नरत होते. त्यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी काही ग्रंथ मागवून अभ्यास सुरू केला होता. त्यांचे अकस्मात जाणे मन हेलावून गेले. त्यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाली.

- प्रकाश कुंभे, नागपूर प्रदेश अध्यक्ष, रिपाइं

- गरीब कॅन्सरग्रस्तांचे देवदूत

भामरागडपासून ते मेळघाटापर्यंत गरीब कॅन्सरग्रस्तांसाठी ते देवदूतच होते. दिवाळीला आकाशकंदील म्हणजे काय, हे मुलांना ठाऊक नसते. मात्र अशा मुलांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे उपलब्ध करून देण्यासाठी दिवाळीला नवीन कपडे भेट देण्याचा कार्यक्रम ते राबवीत असत. कॅन्सरग्रस्तांसाठी दानशूरांना मदतीचे आवाहन करायचे. त्यांच्या निधनाने गरीब कॅन्सरग्रस्तांचा देवदूत हरपला.

प्रशांत डेकाटे, माजी सिनेट सदस्य

Web Title: The polite guide of the Ambedkarite movement was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.