नागपुरात  आक्रमक वृद्धासमोर पोलीस नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:26 AM2020-03-01T00:26:51+5:302020-03-01T00:28:35+5:30

पोलिसांनी उचललेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी एका वृद्धाने भलताच पवित्रा घेतला. ते चक्क वाहन उचलणाऱ्या पोलिसांच्या ट्रकसमोरच झोपले. आधी दुचाकी द्या नंतरच येथून जा, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यांचा तो आक्रमकपणा पाहून पोलीस वरमले अन् त्यांनी दुचाकी वाहनाखाली उतरवून वृद्धाच्या हवाली केली.

Police surrendered before an aggressor in Nagpur | नागपुरात  आक्रमक वृद्धासमोर पोलीस नमले

नागपुरात  आक्रमक वृद्धासमोर पोलीस नमले

Next
ठळक मुद्देदुचाकीसाठी भलताच पवित्रा : पोलिसांच्या वाहनासमोर झोपले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांनी उचललेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी एका वृद्धाने भलताच पवित्रा घेतला. ते चक्क वाहन उचलणाऱ्या पोलिसांच्या ट्रकसमोरच झोपले. आधी दुचाकी द्या नंतरच येथून जा, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यांचा तो आक्रमकपणा पाहून पोलीस वरमले अन् त्यांनी दुचाकी वाहनाखाली उतरवून वृद्धाच्या हवाली केली. त्यांना नमस्कारही केला अन् पोलीस तेथून निघून गेले. शुक्रवारी दुपारी ११.३० च्या सुमारास वर्दळीच्या मानेवाडा चौकानजीक घडलेल्या या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती.
अजनी विभागाच्या वाहतूक शाखेचे पोलीस पथक शुक्रवारी दुपारी ११.३० च्या सुमारास वाहतुकीला अडसर निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत होते.
मानेवाडा चौकाजवळील वर्धमान वाईन शॉपसमोर लावलेल्या काही दुचाकी वाहतुकीला अडसर निर्माण करीत असल्याचे पाहून पोलिसांनी त्या टोईंग व्हॅनमध्ये घातल्या. ते पाहून एक ५८ ते ६० वर्षांचे गृहस्थ पोलिसांजवळ धावत आले. आपली दुचाकी खाली उतरवा, असे ते म्हणू लागले. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात या आणि तेथून घेऊन जा, असे म्हटले. मात्र, वृद्ध मानेना. त्यांनी चक्क पोलिसांच्या वाहनाखालीच धाव घेतली. हा प्रकार घटनास्थळावरची गर्दी वाढवणारा ठरला. पोलिसांनी त्यांना वाहनाखालून बाहेर काढले अन् समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धाने ट्रकच्या समोरचा भाग घट्ट पकडून आपली दुचाकी खाली उतरवण्याचा हेका धरला. पोलीस आणि वृद्धातील वाद अनेकांच्या मोबाईलमधील क्लीपचा विषय ठरला. या प्रकारामुळे चौकातील वाहतूकही खोळंबली. घटनेचा अनेक जण व्हिडिओ बनवीत असल्याचे पाहून पोलिसांनी नमते घेतले. त्यांनी टोईंग व्हॅनमधून दुचाकी खाली उतरवली. ती वृद्धाच्या हवाली केली. त्यांना नमस्कार केला अन् त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

व्हायरल व्हिडिओ अन् धन्यवाद!
आतापर्यंत पोलिसांना गरम देणारे बाबाजी (वृद्ध) दुचाकी हातात मिळताच आनंदले. त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले अन् तेथून सर्वांना टाटा करीत ते निघून गेले. हा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

Web Title: Police surrendered before an aggressor in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.