योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत मागील काही काळापासून गोवंश तस्करीचे प्रमाण वाढले असून पोलिसांकडूनदेखील सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत. जुनी कामठी व सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गोवंश तस्करांविरोधात मोहीमच राबविली व २४४ गोवंशीय जनावरांची सुटका केली. दोन्ही ठिकाणी जनावरांना कत्तलीसाठी बांधून ठेवले होते. त्यांना दाटीवाटीने कोंडण्यात आले होते व चारापाणीदेखील देण्यात येत नव्हता. दुर्दैवाची बाब म्हणजे काही जनावरांवर प्रहार करत त्यांना दिव्यांग करण्यात आल्याची अमानवीय बाबदेखील समोर आली.
जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर, भाजीमंडी येथे एका गोदामात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना ५ जून रोजी मिळाली. पोलिसांकडून दुपारपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. रात्री उशीरा पोलिसांनी धाड टाकली. संवेदनशील भाग असल्याने नवीन कामठी, पारडी, कळमना तसेच आरसीपी पथक बोलविण्यात आले होते. पोलिसांनी तेथए धाड टाकली असता एका गोदामात २३८ लहान मोठी गोवंशीय जनावरे अक्षरश: कोंबण्यात आली होती. त्यांना चारापाणीदेखील देण्यात आला नव्हता. पोलिसांनी तेथून २३.८० लाख रुपये किंमतीच्या जनावरांची सुटका केली. संबंधित जनावरे नब्बू वजीर कुरैशी, साजीद कुतूब कुरैशी, जुबेर अलताब कुरैशी, फैय्याज सत्तार कुरैशी, आसीफ कुरैशी यांची असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सर्व जनावरे लुंबिनी नगर येथील गोशाळेत पाठविली. सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपारीनंतर सदरमध्ये परत जप्तीसदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात गोवंश तस्करांवर गुरुवारी १५ दिवसांच्या तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. सायंकाळी गड्डीगोदाममधील रेल्वे रुळांजवळील मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन ८ जनावरांची सुटका केली. त्यांना कत्तलीसाठीच नेण्यात येणार होते. जनावरांना धंतोलीतील गोशाळेत नेण्यात आले.
पालकमंत्री बावनकुळेंचे आदेश अन पोलिसांची धडक कारवाईबकरी ईदच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी होत असल्याने तस्करांना जेरबंद करा असे आदेश पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलीस सक्रिय झाले व जुनी कामठी भागात कारवाई करण्यात आली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा या कारवाईनंतर सतर्क झाली असून, गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. जर कुणाला कुठलीही माहिती मिळाली तर तातडीने पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन उपायुक्त निकेतन कदम यांनी केले आहे.
मकोका कारवाई करण्याची तयारी
काही गोवंश तस्कर हे सातत्याने गुन्हे करत आहेत. त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई झाल्यानंतरदेखील सुधारणा झालेली नाही. अशा गुन्हेगारांच्या टोळ्यांचे रेकॉर्ड तपासून गरज भासली तर मकोकाअंतर्गत कारवाई करण्याची तयारी असल्याचे उपायुक्त निकेतन कदम यांनी स्पष्ट केले. कामठी व इतर भागांत कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.