योगेश पांडे - नागपूरनागपूर : खाजगी ट्रॅव्हल्सच्या विविध बसेसमुळे शहरात बरेचदा वाहतूक कोंडी दिसून येते. पोलिसांनी अनेकदा केलेल्या आवाहनांनादेखील मुजोर ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर ट्रॅव्हल्सच्या बसेसवर पोलिसांकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. शहरात सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत खाजगी बसेसच्या पिकअप ड्रॉपला बंदी घालण्यात आली आहे. याबाबत वाहतूृक पोलीस उपायुक्त लोहीत मतानी यांनी परिपत्रक जारी केले आहे.
नागपूर शहरातून वर्धा मार्ग, अमरावती मार्ग, जबलपूर मार्ग, छिंदवाडा मार्ग, भंडारा मार्ग, उमरेड मार्गांवर खाजगी ट्रॅव्हल्स धावतात. मनमानी पद्धतीने ते वाट्टेल तेथून पिकअप व ड्रॉप करतात. तसेच अनेक खाजगी ट्रॅव्हल्सचालकांचे कोणतेही अधिकृत पार्कींग व पिकअप करीता निर्धारित जागा नाही. या बसेसमुळे शहरातील अनेक चौक व मार्गांवर दररोज वाहतूक कोंडी होते व हजारो नागरिकांना त्यामुळे मन:स्ताप सहन करावा लागतो. याबाबत नागरिक व काही लोकप्रतिनिधींकडून पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाहतूक पोलीस उपायुक्तांनी दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार शहराच्या इनर रिंगरोड व त्याच्या आतील परिसरात सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत खाजगी ट्रॅव्हल्सनेा शहरातील रस्त्यांवर पार्किंग व पिकअप-ड्रॉपसाठी बंदी घालण्यात आले आहे. १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत हे दिशानिर्देश लागू असतील.
स्वत:चे पार्किंग असलेल्या ट्रॅव्हल्सला एन्ट्री
सैनी, महात्मा, बाबा, सावन, माॅ दुर्गा, खुराना ट्रॅव्हल्स यांची स्वतःची जागा आहे, त्याव्यतिरिक्त इतर काही ट्रॅव्हल्स पे ॲण्डपार्क बेसिसवर पार्किंग करतात. अशी व्यवस्था असलेल्या ट्रॅव्हल्सना शहरात दिवसा प्रवेश राहील. मात्र त्यांना पार्किंगच्या ठिकाणातून प्रवासी बसवावे किंवा सोडावे लागतील. ते रस्त्यांवरून प्रवासी चढवू शकणार नाहीत.
या ठिकाणी होते दररोज वाहतूक कोंडी
सेंट्रल एव्हेन्यू, बैद्यनाथ चौक, विजय टाॅकीज चैक, काॅटन मार्केट चौक, व्हेरायटी चैक, गितांजली चैक, स्नेहनगर बस स्टाॅप, रहाटे काॅलोनी चौक, मानस चौक, टेकडी मार्ग, भोले पेट्रोल पंप चौक, ग्रेट नाग रोड, मध्यवर्ती बसस्थानक चौक, सक्करदरा चौक, दिघोरी चौक, छत्रपती चौक, लिबर्टी चौक, इंदोरा चौक, ऑटोमोटिव्ह चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, चामट चक्की चौक, एचबी टाऊन चौक, जयप्रकाशनगर चौक.
या बसेसला मिळणार एन्ट्री
- एसटी महामंडळाच्या बसेस- मिहान, एमआयडीसी परिसरातील कर्मचाऱ्यांना ने-आण करणाऱ्या खाजगी बसेस- शहराबाहेरून विवाह समारंभ, कार्यक्रमांसाठी प्रवाशांना घेऊन येणाऱ्या बसेस- रुग्णवाहिका, आपत्कालिन सेवा, स्कूल बसेस- ज्येष्ठ नागरिक, महिला स्पेशल, देवदर्शनाच्या बसेस
सणासुदीच्या तोंडावर नागरिकांची होणार अडचण
दरम्यान सणासुदीच्या तोंडावर या नवीन नियमांमुळे अनेकांची अडचण होणार आहे. इनर रिंग रोडच्या बाहेरील स्थानांवरच त्यांना जावे लागणार आहे. त्यामुळे त्या भागांत वाहतूकीची कोंडी निर्माण होईल. याशिवाय अनेक जण दररोज ‘अप-डाऊन’ करतात. त्यांना अधिकचा फेरा पडणार आहे.