४० जनावरांचा मृत्यू : नरखेड तालुक्यातील जुनोना (फुके) येथील घटना
सावरगाव : वडचिचोली मार्गे महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करणाऱ्या एका संशयास्पद कंटेनरचा मध्य प्रदेश पोलीस पाठलाग करीत असताना कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने तो जुनोना (फुके) ता. नरखेड येथे उलटला. या अपघातात कंटनेरमध्ये कोंबून असलेल्या ६६ पैकी ४० गोऱ्ह्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही जनावरे कत्तलखान्यात नेण्यात येत होती, अशी माहिती आहे.
सविस्तर माहितीनुसार शनिवारी सकाळी मध्य प्रदेश येथील वडचिचोली येथील पोलिसांना अवैधरीत्या कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडचिचोली (मध्य प्रदेश) पोलिसांनी एम.पी./०७/एच.बी.१५७० क्रमांकाच्या कंटेनरचा पाठलाग केला. पाठलाग करीत असताना हा ट्रक महाराष्ट्राच्या सीमेत शिरला. मध्य प्रदेश पोलिसांना सावरगाव (नरखेड) तसेच सिंदी (उमरी) येथील काही नागरिकांना याबाबत मोबाईलद्वारे सूचना केली. सिंदी (उमरी) येथे कंटेनरला अडविण्याचा काही नागरिकांनी प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने नागरिकांच्या अंगावर ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. यात नागरिक घाबरून जीव वाचविण्यासाठी बाजूला झाले. यानंतर सिंदी येथील काही नागरिकांनी व मध्य प्रदेश पोलीस या कंटेनरचा पाठलाग करीत असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने जुनोना (फुके) या गावाजवळील वळणावरील पुलाजवळच्या दरीत कंटेनर कोसळला. या अपघातात कंटेनरमध्ये कोंबून असलेल्या ४० जनावरांचा जागेवर मृत्यू झाला तर, २६ जनावरे जखमी झाली होती. जखमी जनावरांवर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. युवराज केने, डॉ. हिंमत बनाईत, डॉ. महेंद्र चौहान यांनी उपचार केले. अपघातात बचावलेली जनावरे नरखेड येथील गोरक्षण येथे पाठविण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास वडचिचोली (मध्य प्रदेश, नरखेड पोलीस करीत आहेत.