नागपूर : जिल्ह्यात सहा लाख नागरिकांचे कोरोना लसीकरण करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करुन दररोज १० ते १५ हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल, असे नियोजन करावे. लसीकरणापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक केंद्रावर मार्गदर्शन व सुविधा केंद्रही सुरू करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लसीकरण मोहिमेचा आढावा डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, माहिती संचालक हेमराज बागुल, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. राजेश गोसावी, डॉ. श्रीवास्तव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, महापालिकेचे अप्पर आयुक्त राम जोशी आदी उपस्थित होते.
कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमासोबतच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर कठोर नियंत्रण करण्यात यावे. त्यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये ६० वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांचे सुलभपणे लसीकरण करता येईल या दृष्टीने नियोजन करा, असे आदेशही संजीव कुमार यांनी दिले.
नागपूर शहर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह ११ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात शासकीय ग्रामीण रुग्णालय व सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय व सुविधा केंद्रावर जनतेचा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी होत असल्यामुळे या सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
४९ केंद्रांवर आरोग्य कर्मचऱ्यांना प्रशिक्षण
- जिल्ह्यातील ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात काटोल व नरखेड येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे या भागासह नगरपालिका क्षेत्रात प्राधान्याने चाचण्यांची संख्या वाढविणे तसेच लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
खासगी रुग्णालयात आजपासून लसीकरण
-शासकीय केंद्रासोबतच शहरातील १६ रुग्णालयात लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. या मोहिमेसाठी रुग्णालयांनी परवानगी दिली असून या केंद्रावर उद्यापासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. शासनाच्या विविध आरोग्य विषयक उपचारासाठी ४० रुग्णालयांची नोंदणी झालेली आहे. या सर्व रुग्णालयांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्यानंतर इतर हॉस्पिटलमध्येही सुविधा सुरू होईल. खासगी रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. जिल्ह्यात लसीकरणासाठी आवश्यक लस उपलब्ध आहे. तसेच खासगी रुग्णालयांना सुध्दा महानगरपालिका अथवा आरोग्य विभागामार्फत लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे.
अंबिका फार्मवर कारवाई
- कळमेश्वर तालुक्यातील अंबिका फार्मवर लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन झाल्याने मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच वाकी येथील द्वारका लॉन्सच्या मालकावर अशाच प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.