रेवराल : नादुरुस्त रस्ते आणि अपघात ही बाब मौदा तालुक्यासाठी नवी नाही. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतात. नागरिकांचा नाहक बळी जातो. पावसाळ्यात तर स्थिती आणखीच वाईट. चाचेर ते कन्हान मार्ग यापैकी एक आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचल्याने चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि गाडी स्लिप होते. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी खंडाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संकेत झाडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावरील अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे नेहमीच केले जाते. मात्र काही दिवसात स्थिती जैसे थे होते. या मार्गावरून होणारी जड वाहनांची वाहतूक यास कारणीभूत आहे. मात्र रस्ते बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने दरवर्षी ही स्थिती उद्भवते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. मात्र याची दखल घेण्यास कुणीही तयार नाही.
---
प्रशासनाने तातडीने सदर रस्ता दुरुस्त केला नाही तर चक्का जाम आंदोलनाचा मार्ग स्वीकारू. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी.
- संकेत झाडे, उपसरपंच, ग्रामपंचायत खंडाळा
--
खोपडी ते कन्हानपर्यंतच्या रस्त्याची स्थिती वाईट आहे. अधिकाऱ्यांना रस्त्यावरचे खड्डे दिसत नाही का? जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- रजत महादुले, सरपंच, ग्रामंचायत, निसतखेडा
---
चाचेर ते कन्हान रस्ता खड्डेमुक्त होणे गरजेचे आहे. या रस्त्याने दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. रोजच्या अपघातामुळे कितीतरी लोकांना अपंगत्व आले आहे. काहींचे जीव गेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
- रोशन मेश्राम, सदस्य, ग्रामपंचायत, नेरला