नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दरदिवशी वाढ होत आहे. पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. त्यातच भर म्हणून या महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्यांच्या महिन्याचे बजेट बिघडले आहे.
२६ जानेवारीला पेट्रोल प्रति लिटर ९३.१० रुपये आणि डिझेल ८३.५६ रुपये होते. २७ रोजी वाढ होऊन पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे ९३.३४ रुपये व ८३.८३ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर सात दिवस भाववाढ झाली नाही. पण ४ फेब्रुवारीला पेट्रोल ९३.६८ रुपये आणि डिझेल ८४.२० रुपयांवर गेले. ५ फेब्रुवारीला पुन्हा भाववाढ होऊन भावपातळी अनुक्रमे ९३.९७ रुपये आणि ८४.५१ रुपयांवर पोहोचली. सरकार दरदिवशी पैशांनी दरवाढ करून ग्राहकांच्या खिशातून छुप्या पद्धतीने पैसे काढत आहेत. अशीच दरवाढ सुरू राहिली तर लवकरच पेट्रोल प्रति लिटर शंभर रुपये आणि डिझेल नव्वदीवर जाणार आहे. डिझेलची किंमत दररोज वाढत असल्याने मालवाहतुकीच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई वाढून त्याचा फटका लोकांना बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील विविध कर कमी करून केंद्र आणि राज्य सरकारने भाव कमी करावेत, अशी मागणी विविध ग्राहक संघटनांनी केली आहे.
याशिवाय या महिन्यात बजेटमुळे गॅस कंपन्यांनी १ फेब्रुवारीला गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ केली नाही. बजेटनंतर ४ फेब्रुवारीला किमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ७७१ रुपयांवर पोहोचली आहे. आता लोकांना एका गॅस सिलिंडरसाठी एवढी रक्कम चुकती करावी लागणार आहे. त्यामुळे सिलिंडरच्या वाढत्या किमतीचा भार सर्वसामान्यांवर बसत असून त्यांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १,६५० रुपयांवर गेली आहे.
१२५ रुपयांऐवजी मिळते केवळ ४० रुपये सबसिडी!
डिसेंबरमध्ये गॅसची किंमत ६४६ रुपये होती तेव्हा सबसिडी ४० रुपये मिळायची. त्यानंतर गॅस कंपन्यांनी १ जानेवारीला ५० रुपये आणि १५ जानेवारीला पुन्हा ५० रुपये अशी एकूण १०० रुपयांची वाढ केली. तेव्हाही ग्राहकांच्या बँक खात्यात ४० रुपयेच सबसिडी जमा व्हायची. आता ७७१ रुपये किंमत झाल्यानंतरही तेवढीच सबसिडी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. डिसेंबरच्या किमतीनुसार ग्राहकांना १२५ रुपये सबसिडी मिळायला हवी. पण सरकार छुप्या पद्धतीने सबसिडी नाकारत असून पुढे सिलिंडरची सबसिडी संपविण्याचा सरकारचा डाव दिसून येत आहे. काही ग्राहकांच्या बँक खात्यात सबसिडी जमा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. पुढे ग्राहकांना बाजारभावानुसार गॅस सिलिंडर खरेदी करावे लागेल का, अशी शंका ग्राहक संघटनांनी व्यक्त केली.