नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला वाहन विमा दाव्याचे २ लाख ५० हजार रुपये ७ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. व्याज २८ जुलै २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
राजू मोठारकर असे ग्राहकाचे नाव असून, ते खरबी येथील रहिवासी आहेत. त्यांची तक्रार आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी निकाली काढली. तक्रारीतील माहितीनुसार, मोठारकर यांनी एका मालवाहू वाहनाचा नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. तो विमा ३१ ऑक्टोबर २०१६ ते ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत वैध होता. १५ डिसेंबर २०१६ रोजी संबंधित वाहनातून तणस नेत असताना बुटीबोरी येथे वीजतारांना स्पर्श होऊन आग लागली. त्यामुळे वाहन जळून सुमारे सहा लाख रुपयाचे नुकसान झाले. या अपघाताची बुटीबोरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर मोठारकर यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडे विमा दाव्याचा प्रस्ताव सादर केला असता, त्यांच्या निष्काळजीपणामुळे वाहनास आग लागल्याच्या कारणावरून तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. परिणामी, मोठारकर यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती. नॅशनल इन्शुरन्स कंपनीने यावर लेखी उत्तर दाखल करून तक्रारीतील सर्व आरोप फेटाळले व मोठारकर यांची तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला.
-------------
३० हजार रुपये भरपाई मंजूर
ग्राहक आयोगाने मोठारकर यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर केली आहे. ही रक्कमदेखील नॅशनल इन्शुरन्स कंपनीनेच द्यायची आहे.