विद्रुप चेहरा घेऊन जगत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण; निधी केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 07:00 AM2021-12-01T07:00:00+5:302021-12-01T07:00:07+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून यायला लागले. जुलै महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिसचे जवळपास १८०० वर रुग्णांची नोंद झाली.

Patients with mucorrhoea are living with a squint face; When will the funds be available? | विद्रुप चेहरा घेऊन जगत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण; निधी केव्हा मिळणार?

विद्रुप चेहरा घेऊन जगत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण; निधी केव्हा मिळणार?

googlenewsNext
ठळक मुद्देकृत्रिम डोळ्यासाठी १० तर जबड्यासाठी ७० रुग्णांची प्रतीक्षा

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनातून बरे होत नाही तोच अनेक रुग्ण म्युकरमायकोसिसच्या विळख्यात सापडले. यातील काहींना जीव वाचविण्यासाठी जबडा, नाक व डोळे गमवावे लागले. चेहऱ्यावर आलेले हे विद्रूपीकरण दूर करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला. मात्र सरकारकडून निधीच उपलब्ध न झाल्याने या रुग्णांवर व्यंग घेऊन जीवन जगण्याची वेळ आली आहे.

नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून यायला लागले. जुलै महिन्यापर्यंत म्युकरमायकोसिसचे जवळपास १८०० वर रुग्णांची नोंद झाली. यातील १६५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तर, १११० रुग्णांवर शस्त्रक्रिया करून कुणाचा डोळा, कुणाचे नाक तर कुणाचा जबडा काढावा लागला. म्युकरमायकोसिसवरील महागडा व दीर्घ कालावधीपर्यंत चालणाऱ्या उपचारामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या रुग्ण खचले. अवयव गमावून कसेबसे आजारातून बरे झालेले रुग्ण कृत्रिम अवयवासाठी शासकीय रुग्णालयाच्या चकरा मारीत आहेत. परंतु निधीअभावी रुग्णालयेही हतबल झाली आहेत. रुग्णांच्या मानसिक मनोबलाचेही खच्चीकरण होत आहे.

- जबडा नसल्याने अन्न नाकातून बाहेर

म्युकरमायकोसिसचा रुग्ण ३८ वर्षीय संजय म्हणाला, या आजारामुळे जबडा काढावा लागला. तोंड आणि नाक याचा मार्ग एकच झाला. त्यामुळे ग्रहण केलेले अन्न नाकाद्वारे बाहेर येते, तसेच गुळणी करताना देखील नाकातून पाणी बाहेर पडते. कृत्रिम जबडा व दंत प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयाने तीन लाखावर खर्च सांगितला. एवढा पैसा नाही. शासकीय दंत रुग्णालयात दाखविले असता निधी नसल्याचे कारण सांगितले.

- दंत रुग्णालयात ८० वर रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत

शासकीय दंत रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ११८ रुग्णांनी उपचार घेतले. यातील ७० रुग्णांवर शस्त्रक्रिया करून कुणाचा खालचा तर कुणाचा वरचा जबडा काढला. या रुग्णांवर कृत्रिम जबडा व १० रुग्णांना कृत्रिम डोळा तयार करण्यासाठी रुग्णालयाने पुढाकार घेतला. यासाठी लागणाऱ्या निधीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्तावही पाठविला. त्यांनीही होकार दिला, परंतु निधी उपलब्ध झालेला नाही. विभागीय आयुक्त या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करणार होत्या. परंतु अद्याप त्यांच्याकडून मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे.

-निधीसाठी पाठपुरावा सुरू

म्युकरमायकोसिस या आजारामुळे चेहऱ्यावरील विद्रूपता दूर करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. जवळपास ७० रुग्णांवर कृत्रिम जबड्याचे प्रत्यारोपण तर १० रुग्णांना कृत्रिम डोळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा केला जात असून लवकरच हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

- डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

Web Title: Patients with mucorrhoea are living with a squint face; When will the funds be available?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.