उमरेड : येथील ४० बेडची सुविधा असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल बेहाल सुरूच आहेत. दररोज ऑक्सिजन थोडाफार मिळाला की दुसऱ्या दिवशी पुन्हा तुटवडा आणि पुन्हा ऑक्सिजनसाठी धावाधाव अशी दयनीय अवस्था या सेंटरमध्ये होत आहे. ऑक्सिजनअभावी कोरोना बाधितांची तडफड सुरू आहे. मागील अनेक दिवसापासून या जीवघेण्या बाबीची सामना कर्मचाऱ्यांना वारंवार करावा लागत असतानाही याकडे लक्ष का पुरविल्या जात नाही, असा सवाल विचारला जात आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे सदर कोविड सेंटर सुरू आहे. रविवारी ३५ कोरोना बाधित या ठिकाणी औषधोपचार घेत होते. त्यांच्यापैकी अनेकांना ऑक्सिजनची गरज असल्याने दिवस-रात्र सुमारे १२ च्या आसपास ऑक्सिजन सिलिंडर संपले. २०-२२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. अशावेळी या ठिकाणी केवळ ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाणारे क्रोमीटर उपलब्ध आहे. या कारणाने सिलिंडर जरी उपलब्ध असले तरी एकावेळी केवळ पाचच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. यामुळे रुग्णांना क्रमाक्रमाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची कसरत येथील कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे.
मागील काही दिवसांपासून दररोज कोविड सेंटरमध्येच मृत्यू होत असल्याच्या बाबीही समोर येत आहेत. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद कदम यांनी निदान आतातरी योग्य पाऊल उचलण्याची आणि गंभीरपणे नियोजन आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. ऑक्सिजन आणि अन्य सोयीसुविधांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा उमरेडचे कोविड सेंटर केवळ कामचलाऊ सेंटर ठरेल, असा आरोप व्यक्त होत आहे.