कामठी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील १६ जि.प. व ३१ पं.स. सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात काही उमेदवारांनी आव्हान दिले आहे. यासोबतच राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळून लावल्यास रिक्त जागांवर निवडणूक अटळ आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक झाल्यास राजकीय पक्षांकडून आधीच्याच उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
कामठी तालुक्यात जि.प.च्या दोन सर्कल तर पं.स.च्या दोन गणात निवडणूक होईल. नवीन आरक्षण सोडतीनुसार गुमथळा-महालगाव जि.प. सर्कल हे सर्वसाधारण झाल्याने येथे भाजपचे अनिल निधान तर काँग्रेसचे दिनेश ढोले यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत जिल्हा पातळीवरील नेतेही अनुकूल आहेत. याव्यतिरिक्त बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी, प्रहार संघटनेनेसुद्धा या सर्कलसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. वडोदा-बिडगाव सर्कल हे सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झाल्याने येथे कॉँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे तर भाजपच्या अनिता चिकटे यांना संधी आहे.
बिडगाव पंचायत समिती गण हे सर्वसाधारण झाल्याने येथे काँग्रेसकडून आशिष मल्लेवार तर भाजपाचे प्रदीप चकोले यांना संधी आहे. येथे बिडगाव ग्रामपंचायतचे सरपंच निकेश कातुरेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. महालगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलाकरिता राखीव झाल्याने भाजपच्या शालू हटवार तर काँग्रेसच्या रिता वैरागडे यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे.