योगेश पांडे, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असे मोदींनी म्हटले आहे. चर्चा झाली तर ती फक्त पीओकेबाबतच होईल, असेही मोदींनी स्पष्ट केले. मोदींनी भारताचे ठोस धोरणच जगासमोर मांडले आहेत', असे फडणवीस नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हटले.
'भारतावर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल. हे पंतप्रधानांनी आज स्पष्ट केले. याशिवाय, भारत कुठलेही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही, असेही मोदींनी सांगितले. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, दहशतवाद्यांचे म्होरके आणि पाकिस्तानचे सरकार यांच्यात कुठलाही फरक करणार नाही, असेही मोदी म्हणाले आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालतो आणि जगासमोर मात्र वेगळीच भूमिका मांडतो. भारताने अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. भारताने कशाप्रकारे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कारवाई केली, हे पंतप्रधानांनी सांगितले', असे फडणवीस म्हणाले.
पुढे फडणवीस म्हणाले की, भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मोदींनी भारताचे धोरण आणि निर्धार जगाला सांगितले. भारताने ऑपरेशन सिंदूर शक्ती आणि संयमाने पार पाडले. त्यासाठी सैन्यदलाचे अभिनंदन आहे. दहशतवादी कृत्य करणारे व त्यांना पोसणारे सरकार एकसारखेच पाहिले पाहीजे, असेही फडणवीस म्हणाले.