नागपूर : कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दोन दिवस शुद्धीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवावरही बेततो. तर अनेकदा उशिरा रेल्वेस्थानकावर पोहोचलेले प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करून थेट मृत्यूलाच आव्हान देतात. अशाप्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीच सावधानी बाळगताना दिसत नाहीत. याबाबत जागृती करूनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते.रेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांसोबत अनेक प्रकारच्या घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी अनेक रेल्वेगाड्यात प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेते. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची लूट करते. अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. परंतु त्या नियमाकडे डोळेझाक केल्यामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊन आपला बचाव करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
काही क्षणांसाठी थेट मृत्यूलाच आव्हान!
By admin | Updated: March 25, 2015 02:31 IST