धूलिवंदन अनेक जण आपल्या कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासह साजरा करतात. त्यामुळे प्रवास करण्यासाठी कुणीच घराबाहेर पडत नाही. प्रवाशांचा दरवर्षी प्रतिसाद मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळानेही धूलिवंदनाच्या दिवशी १० टक्के बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात गणेशपेठ आगारातून दररोज १८ हजार किलोमीटरपर्यंत बसेस चालविण्यात येत आहेत. परंतु धूलिवंदनाच्या दिवशी १० टक्के बसेस सोडण्यात येणार असल्यामुळे केवळ ५ हजार किलोमीटरची वाहतूक होणार आहे, अशी माहिती गणेशपेठचे आगारप्रमुख अनिल आमनेरकर यांनी दिली.
केवळ लांब पल्ल्याच्या बसेस सोमवारी सोडण्यात येणार आहेत. होळी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी होळीसाठी आपापल्या गावाकडे आलेले प्रवासी आपल्या कामाच्या ठिकाणी परत जातात. त्यामुळे मंगळवारपासून एसटीच्या प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...........
सोमवारी येथे जातील बसेस
ग्रामीण भागात प्रवासी धूलिवंदनाच्या दिवशी सहसा प्रवास करीत नाहीत. त्यामुळे सोमवारी केवळ लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. यात हैदराबाद, पुणे, औरंगाबाद, पंढरपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावती येथे गणेशपेठ आगारातून बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच इतर आगारांतून आलेल्या बसेस परत जातील.
...............