- डिजिटल पेमेंट केल्यावरही दंड कायम : वाहन चालकांना रोख रक्कम भरण्याचा दिला जातो सल्ला
फहिम खान/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांच्या रहदारी शाखेकडून विविध कारवाईअंतर्गत ऑनलाईन चालान फाडले जात आहेत. मात्र, ही व्यवस्था सुरुवातीपासूनच चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एका वाहन चालकाने चालानचे शुल्क ऑनलाईन माध्यमातून त्याच दिवशी भरल्यावरही १५ दिवसानंतर दंडाची रक्कम कायम दाखविली जात आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतानाही विभागाकडून कोणतेच उपाय योजल्या जात नसल्याने वाहन चालक त्रस्त आहेत.
११ जून रोजी ट्रॅफिक कर्मचाऱ्याने एका नागरिकावर नो-पार्किंगमध्ये वाहन उभे ठेवल्याच्या कारणावरून २५० रुपयाचे चालान फाडले होते. त्या व्यक्तीने त्याच दिवशी रहदारी विभागाकडून देण्यात आलेल्या लिंकवर २५० रुपये दंडाचे शुल्क भरले. परंतु, १५ दिवसानंतरही दंडाची ती राशी तशीच शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने शहरातील डीसीपी (ट्रॅफिक) कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता, तेथील ई-चालान कक्षातील कर्मचाऱ्याने महाट्रॅफिक ॲप डाऊनलोड करून त्यावर तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. संबंधित व्यक्तीने ॲपवर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, जॅमरची कारवाई असल्याने या प्रकरणात तक्रार स्वीकारली जात नाही, असा मॅसेज आला. त्यानंतर रहदारी विभागाच्या सोशल मीडिया अकाऊंट व हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला असता, जे शुल्क भरले आहे ती रक्कम बँकेकडून परत मागवता येत असल्याचे सांगण्यात आले. रहदारी विभागाकडे ती रक्कम परत करण्याचे कोणतेच माध्यम उपलब्ध नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आता दंडाची जी रक्कम शिल्लक दाखविली जात आहे, ते शुल्क पुन्हा रहदारी शाखा किंवा ट्रॅफिक कर्मचाऱ्याकडेच भरावे लागणार आहे. मात्र, दंड भरल्याची पावती दिली जाणार नाही. डिजिटल क्रांतीच्या या काळात डिजिटल पेमेंटसंदर्भात वाहनचालकांना त्रस्त व्हावे लागत असल्याने, या प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
समस्या लवकरच सोडवू
मी सध्या शहराच्या बाहेर आहे. परंतु, या प्रकरणातील संपूर्ण माहिती घेऊन ही समस्या लवकरच सोडवतो. कोणत्याही चालकाला एका चालानसाठी एकपेक्षा अधिक वेळा दंड भरण्याची गरज नाही. ही समस्या का उद्भवत आहे, त्याचा शोध घ्यावा लागेल.
- सारंग आव्हाड, डीसीपी, ट्रॅफिक
.....................