लाेकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : परिसरात १२ दिवसांपूर्वी काेसळलेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील गहू व हरभऱ्याचे कापणीला आलेले पीक आणि संत्र्याच्या अंबिया बहाराचे माेठे नुकसान झाले. स्थानिक लाेकप्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त पिकांची नुकतीच पाहणी केली असून, पंचनामा अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
अवकाळी पावसामुळे सावरगाव (ता. नरखेड) व परिसरातील गावांमधील गहू, हरभरा व संत्र्याच्या अंबिया बहराचे माेठे नुकसान झाले, शिवाय गहू व हरभऱ्याची प्रतही खालावली. त्यामुळे या नुकसानाची शासनाकडून याेग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही या भागातील शेतकऱ्यांनी रेटून धरली हाेती. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य देवका बाेडखे, कृषी सहायक गाेपाल मानकर व अन्य कर्मचाऱ्यांनी राजेंद्र कुडे (रा. सावरगाव) यांच्या सावरगाव शिवारातील तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा अहवाल तातडीने तयार करून ताे शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही देवका बाेडखे व गाेपाल मानकर यांनी संयुक्तरीत्या दिली. यावेळी माजी सरपंच उमेश सावंत, राकेश बोदड, हंसराज गिरडकर, समीर गोडबोले, विवेक गोडबोले, तौसिफ शेख, ललित तांदळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.