डिमांड नोटसाठी आठ हजारांची लाच : रंगेहात पकडलेनागपूर : भूखंड नावाने करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यासच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. गुरुवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे नासुप्र परिसरात एकच खळबळ उडाली. राजेश्वर धनराज लेकुरवाळे (वय ४६) असे आरोपीचे नाव आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजनेअंतर्गत प्रजापतीनगरात राहणारे अभिषेक बोरकर यांच्या आईच्या नावाने ४४ क्रमांकाचा भूखंड व्हावा, म्हणून त्यांनी नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. संबंधित कागदपत्रे दिल्यानंतर त्यासंबंधाची डिमांड नोट मिळावी म्हणून तक्रारदार बोरकर यांनी नासुप्रत वारंवार चकरा मारल्या. हे काम सांभाळणारा कनिष्ठ लिपीक राजेश्वर लेकुरवाळे याने १० हजारांची लाच दिल्याशिवाय काम होणार नाही, असे सांगितले. हातपाय जोडूनही तो मानत नसल्यामुळे बोरकर यांनी एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यांनी शहानिशा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सरकारी पंचासमक्ष शहानिशा केली असता बोरकर यांना आरोपी लेकुरवाळेने १० हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. पंचासमक्ष लेकुरवाळेने तडजोड केल्यानंतर आठ हजार रुपयांत डिमांड नोट काढून देण्याचे मान्य केले. त्यानुसार अधीक्षक संजय दराडे, अतिरिक्त अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीतर्फे सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास बोरकर लाचेचे आठ हजार रुपये घेऊन लेकुरवाळेकडे गेले. लेकुरवाळेने ही लाच स्वीकारताच आजूबाजूलाच दबा धरून बसलेले एसीबीचे उपअधीक्षक मोहन सुगंधी, रोशन यादव, पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे, चंद्रशेखर कडू, हवलदार शंकर कांबळे, रविकांत डहाट, शिशुपाल वानखेडे यांनी लेकुरवाळेला रंगेहात पकडले.(प्रतिनिधी)घराचीही झडतीया कारवाईमुळे नासुप्र परिसरात एकच खळबळ उडाली. लेकुरवाळेला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरोधात सदर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली. या घरझडतीत काय मिळाले, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही.
नासुप्रचा लिपीक अटकेत
By admin | Updated: June 17, 2016 03:13 IST