नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांसोबतच सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यांत करण्यात आलेल्या २८६८ चाचण्यांपैकी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. २१० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ३४० वर आली आहे.
ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,५७८ रुग्णांची नोंद झाली आहे. १,३९,५३४ कोरोनामुक्त झाले तर २३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कामठी तालुक्यात १३८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. कुही तालुक्यातही एकाही रुग्णांची नोंद झाली नाही. कळमेश्वर ग्रामीणमध्ये केतापार येथे एका रुग्णांची नोंद झाली.
कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आतापर्यंत ३३९४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ३२६५ कोरोनामुक्त झाले आहेत १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काटोल तालुक्यात ११६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात कोंढाळी केंद्राअंतर्गत दोन तर येनवा केंद्राअंतर्गत एका रुग्णाची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तालुक्यात आतापर्यंत ६५३४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ६३८४ कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या १५० इतकी आहे. उमरेड शहरात एका रुग्णाची नोंद झाली.