सुमेध वाघमारे
नागपूर : वैद्यकीय शास्त्राचा झपाट्याने विकास होत आहे. त्याअंतर्गत अत्याधुनिक सामग्रीदेखील या क्षेत्रात येत आहे. मेडिकलनेही एक पाऊल पुढे टाकत ‘ऑर्थाेपेडिक’ व ‘गायनेकॉलॉजी सिम्युलेटर’ यंत्र असलेली कौशल्य विकास प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शस्त्रक्रियेतील अचूकता शिकण्यास विद्यार्थ्यांना जिथे वर्ष लागायचे तिथे हा कालावधी कमी होऊ शकतो. तो आपले कौशल्य व अनुभव विकसित करू शकतो.
‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिकाचाही अभ्यास करावा लागतो. पदव्युत्तर अभ्यासक्रम तर पूर्णत: प्रात्याक्षिकांवर आधारित असतो. यामुळे विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारचे कौशल्य आत्मसात करता यावे, अशी प्रयोगशाळा असावी या उद्देशातून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी कौशल्य प्रयोगशाळेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रकल्पाला शासनाने नुकतेच ३ कोटी ६३ लाखांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. अद्ययावत कौशल्य प्रयोगशाळा असलेले राज्यातील हे पहिले महाविद्यालय ठरणार आहे.
-सिम्युलेटरवर गायनिक व आर्थाेपेडिक शल्यक्रियेचे प्रशिक्षण
मेडिकलच्या या कौशल्य प्रयोगशाळेत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उपचाराशी निगडित प्राथमिक कौशल्ये, ‘कॅडव्हरिक डिसेक्शन’, ‘हॅण्ड्स ऑन वर्कशॉप’चाही लाभ एकाच छताखाली आत्मसात करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र (गायनिक) आणि अस्थिरोग विभागाच्या (ऑर्थाेपेडिक) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रसूतीदरम्यान होणारी गुंतागुंत हाताळणे, गुडघा, हिप, एलबो रिप्लेसमेंट यांसारख्या शल्यक्रियांचे कौशल्य सिम्युलेटरवर आत्मसात करता येणार आहे.
-विद्यार्थ्यांना मोठी संधी
वैद्यकीय क्षेत्रात वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली राहून शस्त्रक्रियेतील कौशल्य विकसित करता येते. परंतु याला अनेक महिने लागू शकतात. परंतु ‘सिम्युलेटर’ सारख्या अद्ययावत यंत्रावर वरिष्ठ डॉक्टरांच्या मदतीविनाही विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेता येते. कुठे चूक झाल्यास याची माहिती यंत्राच्या संगणकावर मिळते. यामुळे शस्त्रक्रियेतील अचूकता शिकता येते. जिथे पूर्वी एक शस्त्रक्रिया शिकण्यास महिने लागायचे तिथे हा कालावधी कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
-लवकरच विद्यार्थ्यांच्या सेवेत प्रयोगशाळा
विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी मेडिकलमध्ये प्राथमिक उपकरणे आहेत. आता यात ‘ऑर्थाेपेडिक व गायनेकॉलॉजी सिम्युलेटर’ची भर पडणार आहे. या उपकरणांसाठी औषधालयाच्या वरच्या माळ्यावरील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हाफकिनमार्फत उपकरणांची खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या सेवेत असेल.
-डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल