होळीच्या पर्वावर भांग चॉकलेट स्वरुपात; शाळकरी व युवकांमध्ये वाढले व्यसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:09 PM2018-03-03T12:09:02+5:302018-03-03T12:09:09+5:30

शहरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेच्या विळख्यात नागपुरातील तरुणाई अडकली जात आहे. आता यात भर पडली आहे ती म्हणजे ‘मस्ताना मनुक्का’च्या नावावर भांग चॉकलेटची.

Now cannabis in chocolate; Increased addiction among school and youth | होळीच्या पर्वावर भांग चॉकलेट स्वरुपात; शाळकरी व युवकांमध्ये वाढले व्यसन

होळीच्या पर्वावर भांग चॉकलेट स्वरुपात; शाळकरी व युवकांमध्ये वाढले व्यसन

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मस्ताना मनुक्का’ नावाने धडाक्यात विक्री

सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेच्या विळख्यात नागपुरातील तरुणाई अडकली जात आहे. आता यात भर पडली आहे ती म्हणजे ‘मस्ताना मनुक्का’च्या नावावर भांग चॉकलेटची. होळीच्या पर्वावर पानठेल्यापासून ते किरणा दुकानात हे चॉकलेट सर्रास उपलब्ध झाले आहे. याच्या गर्तेत शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते तरुण सापडला असून व्यसन वाढत असल्याचे चित्र आहे.
केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे पुढे याच्या विळख्यात आपसूकच सापडतात. सुरुवातीला कुणीही अमली पदार्थ व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही. मात्र हळूहळू जेव्हा याचे सेवन वाढते तेव्हा ते कधी अडकले हे त्यांनाही कळत नाही. ‘मस्ताना मनुक्का’च्या बाबतीत असेच होत आहे. केवळ पाच रुपयाचे मिळणारे हे चॉकलेट सलग चार-पाच दिवस खाल्ल्यानंतरच याचे व्यसन लागत असल्याचे एका युवकाने सांगितले. त्याला बोलते केल्यावर दुधात मिसळून हे चॉकलेट खाल्ल्यास याची नशा वाढत असल्याचे त्याने सांगितले.  हे चॉकलेट पानठेलेवाले किंवा दुकानदार सामान्यांना देत नसल्याचे ‘लोकमत’ चमूला आढळून आले. अनेक जण चार-पाच चॉकलेट खाऊन दिवसभर नशेत राहत असल्याचे यातीलच एका तरुणाने सांगितले.

आयुर्वेदिक औषधाच्या नावावर भांग
‘मस्ताना मनुक्का’ चॉकलेच्या वेष्टनावर आयुर्वेदिक औषध असे लिहिले आहे. आतील चॉकलेट हिरव्या रंगाचे असून चव कडवट आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरापासून मध्यवर्ती बसस्थानक, सीताबर्डी, धरमपेठ, भगवाघर परिसर, मेयो चौक परिसर, मेडिकल चौक, मोमीनुपरा, बाबा बुद्धाजीनगर, इंदोरा, भांडेवाडी, मानेवाडा, झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा या परिसरातील निवडक पानठेले व दुकानांवर या चॉकलेटची सर्रास विक्री होत असल्याचे ‘लोकमत’चमूला आढळून आले.

वैद्याच्या सल्ल्यानुसार खाण्याचा इशारा
या चॉकलेटच्या वेष्टनाच्या मागील भागात ‘शेड्यूल ई’ असे लिहून केवळ वैद्याच्या सल्ल्यानंतरच खाण्याचा इशारा लिहिला आहे. या शिवाय एक किंवा दोन गोळी जेवणाच्या एक तासानंतर चोखण्याचा सल्लाही दिला आहे. यात शक्तिवर्धकापासून ते त्रिदोषनाशक घटक असल्याचेही नमूद आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथील हे उत्पादन आहे.

अशी चढते नशा
या चॉकलेटची नशा करणाऱ्या एका युवकाने सांगितले की, चार-पाच चॉकलेट खाल्ल्यावर हळूहळू आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, यापासून अनभिज्ञ होत जातो. वेगळीच तंद्री लागते. झोप येते. काही जण हे चॉकलेट खाल्यावर बडबडायला लागतात. कुणी खातच राहतात, तर कुणी हसतच राहतात. चार दिवस सलग ही चॉकलेट खाल्ल्यास याचे व्यसन लागत असल्याचेही त्या युवकाने सांगितले.

केवळ शाळकरी व तरुणांनाच विक्री
‘मस्ताना मनुक्का’ नावाने विक्री होणारे हे चॉकलेट पानठेलेवाले किंवा दुकानदार सामान्यांना देत नसल्याचे ‘लोकमत’ चमूला आढळून आले. गुरुवारी चमूने विविध पानठेल्यावर या चॉकलेटची मागणी केल्यावर अनेकांनी नकार दिला. परंतु याच चॉकलेटसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पानठेल्यावाल्याकडे पाठविले असता त्यांना ते सहज मिळाले. अनेक जण चार-पाच चॉकलेट खाऊन दिवसभर नशेत राहत असल्याचे यातीलच एका तरुणाने सांगितले.

यकृताला नुकसान पोहचविते
भांग खाल्ल्याने मेंदूवर प्रभाव पडतो. यकृताचा त्रास असणाºयांना किंवा दारूमध्ये मिसळून भांग खाणाऱ्यांच्या यकृताला नुकसान पोहचविते. विशेष म्हणजे, रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका असतो.
-डॉ. अमोल समर्थ

 

Web Title: Now cannabis in chocolate; Increased addiction among school and youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.