नागपूर : सत्र न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला नोटीस जारी करून धार्मिक हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम शमीम खान (३८) याच्या जामीन अर्जावर येत्या १ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अर्जावर न्यायाधीश आर. जे. राय यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. फहीम निर्दोष असून त्याला या प्रकरणात राजकीय दबावामुळे फसविण्यात आले आहे. त्याला कायदा व सुव्यवस्थेचा आदर आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा, असा युक्तीवाद फहीमचे वकील ॲड. अश्विन इंगोले यांनी न्यायालयासमक्ष केला. सरकारच्यावतीने ॲड. नितीन तेलगोटे यांनी नोटीस स्वीकारली. फहीमविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी १८ मार्च २०२५ रोजी देशद्रोहासह इतर विविध गंभीर गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला आहे. त्याला त्याच दिवशी अटकही करण्यात आली. तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.