Notice to Nagpur University Vice-Chancellor Siddharthvinayak Kane | नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे यांना नोटीस
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे यांना नोटीस

ठळक मुद्देसत्र न्यायालय : एफआयआर नोंदविण्यासाठी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, माजी कुलसचिव पुरण मेश्राम व उपकुलसचिव (विद्या) अनिल हिरेखण यांच्याविरुद्ध भादंवीच्या कलम १२०-ब, १६६, १७७, २०१, ४०६, ४०९, ४७१ आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (क) व (ड) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यासाठी पत्रकारिता अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर या तिघांसह सीताबर्डी पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणावर आता ३० मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हिरेखण यांनी जुलै-२०१३ मध्ये सहायक कुलसचिवपदाकरिता अर्ज केला होता. परंतु, त्यांच्याकडे या पदाकरिता आवश्यक असलेला प्रशासकीय अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केले. असे असताना पुरण मेश्राम यांचा समावेश असलेल्या छाननी समितीने त्यांचा अर्ज वैध ठरवला. त्यानंतर निवड समितीने या पदासाठी हिरेखण यांची निवड केली असे मिश्रा यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात वरील कलमांतर्गत एफआयआर नोंदवला जावा याकरिता मिश्रा यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

 


Web Title: Notice to Nagpur University Vice-Chancellor Siddharthvinayak Kane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.