जितेंद्र ढवळे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैमानिक होण्याचे स्वप्न आता केवळ महानगरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. विदर्भातील युवकांसाठीच त्यांच्या मातीतून आकाशाला गवसणी घालण्याची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या नागपूर फ्लाइंग क्लबने (एनएफसी) चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा येथे सुरू केलेल्या उड्डाण प्रशिक्षण केंद्राने अवघ्या वर्षभरात १५०० उड्डाण तास पूर्ण करत चार विद्यार्थ्यांना कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) मिळवून दिले आहे. परवडणाऱ्या खर्चात दर्जेदार प्रशिक्षण देणारी ही संस्था आता विदर्भातील वैमानिक घडविण्याचे केंद्र ठरत आहे.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मुख्य केंद्र असलेल्या नागपूर फ्लाइंग क्लबने वाढती हवाई वाहतक आणि प्रशिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेत उड्डाण प्रशिक्षणाचा काही भाग मोरवा, चंद्रपूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने चंद्रपूर विमानतळ पाच वर्षांसाठी लीजवर उपलब्ध करून देत या उपक्रमाला बळ दिले.
महानिदेशक नागरी विमान वाहतूक (डीजीसीए) यांची मान्यता मिळाल्यानंतर १२ फेब्रुवारी २०२५ पासून मोरवा येथे प्रशिक्षणाला अधिकृत प्रारंभझाला. सध्या तीन सेसना-१५२ आणि एक सेसना-१७२ अशा चार विमानांच्या ताफ्यातून नियमित उड्डाण प्रशिक्षण सुरू आहे. वर्षभरात तब्बल १५०० उडाण तासांची नोंद ही संस्थेच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारी आहे.
सध्या मोरवा, चंद्रपूर येथे २० विद्यार्थी प्रत्यक्ष उड्डाण प्रशिक्षण घेत असून, नागपूर येथे ११ विद्यार्थी ग्राउंड ट्रेनिंग पूर्ण करत आहेत. मोरवा केंद्र सुरू झाल्यापासून चार विद्यार्थ्यांनी कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) प्राप्त केले असून अनेक जण अंतिम टप्प्यात आहेत. चंद्रपूर येथे अद्याप रात्रीच्या उड्डाणाची सुविधा नसल्याने नाइट फ्लाइंग प्रशिक्षण नागपूर येथे दिले जाते; मात्र ही सुविधा लवकरच उपलब्ध करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
युवकांसाठी करिअरचा 'हाय फ्लाइंग' मार्ग
देशात विमान वाहतुकीचा वेग झपाट्याने वाढत आहे. नवीन विमान कंपन्या, वाढती आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि प्रशिक्षित पायलट्सची वाढती मागणी यामुळे सीपीएलधारकांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. अशावेळी सरकारी मान्यताप्राप्त, परवडणाऱ्या खर्चातील आणि दर्जेदार प्रशिक्षण देणारे केंद्र विदर्भातच उपलब्ध असणे ही मोठी जमेची बाजू आहे.
मोरवा येथे अत्याधुनिक 'हँगर'
राज्य सरकारतर्फे मोरवा, चंद्रपूर येथे सर्व आवश्यक विमानन सुविधांनी सुसज्ज अत्याधुनिक 'हँगर' उभारण्यात येत आहे तसेच नागपूर उड्डाण क्लबच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संस्थेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ३० सप्टेंबरला नागपूर उड्डाण क्लबला देशातील 'टॉप टेन' उड्डाण प्रशिक्षण केंद्र म्हणून घोषित केले आहे. ही मान्यता विदर्भाच्या दृष्टीने अभिमानाची आहे.
"नागपूर फ्लाइंग क्लबचा मेकओव्हर केला जात आहे. यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनात कृती आरखडा निश्चित करण्यात आला आहे. मोरवा येथील केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱ्या १० विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची जबाबदारी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने (सरकारने) घेतली आहे. मार्चमध्ये आणखी चार विद्यार्थी सीपीएल मिळवतील."- तेजुसिंग पवार, अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक, नागपूर फ्लाइंग क्लब
Web Summary : Nagpur Flying Club's Morwa center offers affordable pilot training, empowering Vidarbha youth. Fifteen hundred flying hours logged, four students earned Commercial Pilot Licenses. Enhanced facilities and government support boost the region's aviation prospects, with more pilots on the horizon.
Web Summary : नागपुर फ्लाइंग क्लब का मोरवा केंद्र किफायती पायलट प्रशिक्षण प्रदान करता है, जिससे विदर्भ के युवाओं को सशक्त बनाया जा रहा है। पंद्रह सौ उड़ान घंटे दर्ज किए गए, चार छात्रों ने वाणिज्यिक पायलट लाइसेंस अर्जित किए। बेहतर सुविधाएं और सरकारी समर्थन क्षेत्र की विमानन संभावनाओं को बढ़ावा दे रहे हैं, और अधिक पायलट क्षितिज पर हैं।