चला भरा आता दंड : वाहतूक पोलिसांची धडक कारवाई नागपूर : अपघातात डोक्याला जबर दुखापत होऊन मृत्यू झाल्याच्या घटना सारख्या घडत असतानाही दुचाकीचालक धडा घ्यायला तयार नसल्याचे पाहून मंगळवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीची धडक कारवाई हाती घेतली. सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत हेल्मेट न घालणाऱ्या ७१०८ दुचाकीचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. दुचाक्यांच्या अपघातात डोक्याला दुखापत झाल्यामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे भयावह वास्तव असूनही अनेक दुचाकीचालक हेल्मेट वापरण्याचे टाळतात. गेल्या आठवड्यात शहरातील विविध भागात झालेल्या अपघातात कंपनी सेक्रेटरी तरुणी, जीम ट्रेनरसह पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे दुचाकी अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा विषय घेऊन वाहतूक पोलीस आज कारवाईसाठी सरसावले. सकाळपासूनच विविध भागात विनाहेल्मेटने दुचाकी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली. दिवसभरात एकूण ७११० दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात सर्वसामान्य नागरिक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षिका, पाच पोलीस आणि एसआरपीएफच्या दोन जवानांचाही समावेश आहे.(प्रतिनिधी)नियम न पाळणाऱ्या इतरांवरही कारवाई गेल्या वेळी वाहतूक पोलिसांनी ७२६३ दुचाकीचालकावर कारवाई केली होती. आज पोलिसांनी हेल्मेट सोबतच सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्या ३१६, ट्रीपल सीट दुचाकी चालविणाऱ्या १०, सिग्नल तोडणाऱ्या ७६ आणि अन्य ९० अशा एकूण ७६१० वाहनचालकांवर कारवाई कारवाई करून बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्याचा नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केला. शिवाय शासकीय तिजोरीत ७ लाख, ६ हजार, १०० रुपयांची गंगाजळी ओतली. ही कारवाई आता नियमितपणे सुरू राहील, असे पोलीस उपायुक्त भारत तांगडे यांनी सांगितले.नो एस्क्यूज !९ फेब्रुवारीला वाहतूक पोलिसांनी हेल्मेटची धडक कारवाई सुरू केली. त्यावेळी ९० टक्के दुचाकीचालकांनी ‘आम्हाला माहीत नव्हते, हेल्मेट घ्यायलाच चाललो’, अशी सबब सांगितली. आज अशी कोणतीही सबब सांगायची सोय नव्हती. रस्त्यारस्त्यावर हेल्मेटवाले दुकान थाटून बसल्यामुळे दुचाकीचालक पोलिसांनी दिलेली दंडाची पावती चूपचाप खिशात टाकून पुढे जाताना दिसत होते.
हेल्मेट का घालत नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 03:09 IST