अधिकाऱ्यांची बैठकीला दांडीनागपूर : कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईपुढे स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर हतबल झाले आहेत. बोरकर यांनी कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी पाच झोनच्या बैठका घेतल्या. या बैठकीचा अजेंडा काढूनही कर विभागाची जबाबदारी असलेले उपायुक्त काकडे व कर आणि कर निर्धारक शशिकांत हस्तक हे दोन्ही अधिकारी एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. अनुपस्थितीचे कारणही त्यांनी कळविले नाही. एकीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी असताना दुसरीकडे कर विभागाने उत्पन्नाचे फक्त ३० टक्के लक्ष्य गाठले आहे. याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असा प्रस्ताव बोरकर हे महापौर प्रवीण दटके यांच्याकडे सादर करणार आहेत.बोरकर यांनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, हनुमाननगर व नेहरूनगर या पाच झोनमधील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. या सर्व बैठकींना कर आकारणी समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख उपस्थित होते. या पाचही झोनची वसुली समाधानकारक नसल्याचे दिसून आले. रामदासपेठ, रामनगरसारख्या भागातही अत्यल्प कर वसुली झाली आहे. ३०० कोटी उत्पन्नाचे लक्ष्य असताना आॅक्टोबरपर्यंत फक्त ९४ कोटी ४८ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यातही ३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे हस्तक यांच्याकडे सुनावणीसाठी १५० च्यावर प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणांपासून मिळणाऱ्या कराची रक्कम ९ कोटी रुपयांहून अधिक आहे. वारके, जामगडे, नेरळ यांच्याकडेही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत ही प्रकरणे निकाली काढली तर उत्पन्नात वाढ होऊ शकते. मात्र, कर विभागातील अधिकाऱ्यांचे वसुलीकडे, उत्पन्न वाढीकडे कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बोरकर यांनी केला. प्रत्येक झोनमध्ये सरासरी ६ कर संग्राहकांची कमतरता आहे. प्रशासनाला कर वसुलीसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उर्वरित पाच झोनच्या आढावा बैठक रद्द करण्यात येत आहे. महापौर दटके हे नागपुरात परतल्यावर त्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन कर विभागाच्या बेजबाबदारपणाचे सर्व मुद्दे मांडले जातील व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला जाईल, असेही बोरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
कर विभागाला ना उरला कुणाचा डर !
By admin | Updated: November 26, 2014 01:02 IST