योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भगिरथाने प्रयत्न करून भारतात गंगा आणली आणि तिने देशाला सुजलाम सुफलाम केले. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनेक भगिरथांनी आयुष्य समिधा अर्पण करुन समाजात पोहोचविले आहे. आज संघाने विशाल रूप धारण केले आहे. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाला थांबविता येत नाही, त्याचप्रमाणे संघाला थांबविण्याचेदेखील कुणाकडेच साहस नाही, असे प्रतिपादन संघाचे माजी सरकार्यवाह व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. बुधवारी ‘संघ गंगा के तीन भगिरथ’ या नाटकाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
वनामती येथे आयोजित या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक व नाटकाचे लेखक श्रीधर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. हे नाटक संघाचे प्रथम तीन सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरूजी व बाळासाहेब देवरस यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे आहे. देश गंगेमुळे सुजलाम सुफलाम झाला व त्याचे खरे कारण भगिरथ आहे. संघाच्या गंगेतदेखील पहिले तीन सरसंघचालक हे भगिरथासारखेच होते. रामायण, महाभारत कुणीही प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यामुळे त्याचे नाट्य उभारताना एखादा प्रसंग पाहताना मनात शंका येत नाही. मात्र संघाच्या तीन भगिरथांचे आपण साक्षीदार आहोत. त्यांनी समाजातील शुद्ध प्रवाह अविरल चालत राहील यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. जोपर्यंत समाजाला आवश्यकता असेल तोपर्यंत संघप्रवाह सुरूच असेल, असे भय्याजी म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी, दिलीप जाजू, निखील मुंडले, निलिमा बावणे, अरुणा पुरोहित हेदेखील उपस्थित होते.