नागपूर : माझा स्वभाव शिस्तीचा असून जलद गतीने प्रवास व विकास व्हावा, यावर नेहमीच भर असतो. माझे मित्र नितीनजी, ‘आप बोलते बहुत प्यारे हो, पर लेटर भी सक्त लिखते हो’. कर्तव्यकठोर आहेत. जे आहे ते लिहावेच लागेल. तुम्हा-आम्हाला बाळासाहेबांची शिकवण मिळाली आहे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटरबॉम्बला उत्तर दिले. एवढेच नव्हे तर विकासाच्या मार्गात स्पीड ब्रेकर येऊ देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांच्या समक्ष दिली.
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत झिरो माईल व कस्तूरचंद पार्क स्टेशन आणि मार्ग व फ्रीडम पार्कच्या उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे झाले. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली.
वाशिम महामार्गाच्या कामात शिवसैनिक अडथळे आणत असून ते कंत्राटदारांच्या साहित्याची जाळपोळ करीत असल्यामुळे महामार्गाच्या कामाला उशीर होत असल्याचे पत्र नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. या पत्राची चर्चा संपूर्ण राज्यात ‘लेटरबॉम्ब’ म्हणून झाली होती. या लेटरबॉम्बवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देता शिवसैनिकांना तंबी दिली होती. शुक्रवारच्या कार्यक्रमात दोन्ही नेते हजर असल्याने मुख्यमंत्री लेटरबॉम्बला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री म्हणाले, जनतेच्या विकास कामांच्या आड कुणालाही येऊ देणार नाही. तो अधिकार जनतेचा आहे. जनतेच्या आशीर्वादाने सर्वजण मोठे होतात. हा आशीर्वाद मोठा असतो. तो जन्मात फेडता येणार नाही. नितीनजी आश्वस्त राहा, विकास कामे होतील, अशा शब्द त्यांनी गडकरी यांना दिला.
गडकरींकडूनही मुख्यमंत्र्यांचे कौतुक
- प्रारंभी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. विकास कामांमुळेच महाराष्ट्र बदलत आहे. भव्य प्रकल्पांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो, असे सांगत गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीला पाठबळ दिले. ठाणे आणि मुंबईच्या विकास कामांसाठी १ लाख कोटी रुपये देऊ, अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.