नागपूर, दि. 2- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात विविध चर्चा रंगल्या असून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वेखात्याची जबाबदारी देण्याची शक्यता असल्याचे कयास राजकीय वर्तुळात वर्तवले जात आहेत. मात्र कोणत्या खात्याचा मंत्री कोण होणार व कुणाला कुठली जबाबदारी द्यायची, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ठरवतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले अहे. नितीन गडकरी शनिवारी विशेष विमानाने नागपुरात आले. यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांनी गडकरी यांना मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विचारणा केली. मात्र गडकरी यांनी यावर ठोस बोलण्यास नकार दिला. मंत्री कोण होणार ते पंतप्रधानच ठरविणार इतकेच केवळ ते म्हणाले. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतादरम्यान, नितीन गडकरी यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात आणखी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता लक्षात घेता, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्रालयाची धुरा सक्षमपणे सांभाळली असून या मंत्रालयाच्या कामांना वेग दिला आहे. त्यामुळे नवीन जबाबदारी मिळाल्यावरदेखील त्यांच्या कामाचा धडाका कायमच राहील, अशी भावना कार्यकर्ते व पदाधिका-यांनी बोलून दाखविली. नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचीच चर्चा दिसून येत आहे.
रेल्वे मंत्रालयाबाबत नितीन गडकरींचं मौन, म्हणाले मंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधानच घेतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 22:35 IST