लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृत्तपत्र विक्रेते हे अत्यंत मेहनतीने आणि तळमळीने आपला व्यवसाय करणारा समाजातील घटक आहे. घरोघरी जाऊन सेवा देण्याचे काम हे लोक सतत करीत असतात. त्यांच्या समस्या या साध्या असून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्व समस्या या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने शासनासमोर मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. तसेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने आपण स्वत: वकिली करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. कृपाल तुमाने, आ. प्रवीण दरेकर, आ. सुधाकर कोहळे, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, श्रीकृष्ण चांडक, राजेश पांडे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरिचंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार यांच्यासह संघटनेचे राज्य व नागपूर शहरातील पदाधिकरी उपस्थित होते.वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, घरकूल योजनेचा लाभ द्यावा, पेन्शन मिळावी, वृत्तपत्र विकेत्यांना कायमस्वरूपी स्टॉल मिळावे, रेल्वेस्टेशन व बसस्टँडवर प्राधान्याने स्टॉल मिळावे व अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आ. प्रवीण दरेकर, अॅड. सुलेखा कुंभारे, श्रीकृष्ण चांडक आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्यासाठीच्या आरोग्य विम्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी अकोला येथील सुभाष गवई या अंध वृत्तपत्र विक्रेत्याचा सत्कार करण्यात आला.
रॅली निघालीवृत्तपत्र विक्रेत्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी राज्यभरातून प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही संघटना लवकरच राष्ट्रव्यापी होणार असल्याने बिहार, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान आदी राज्यातील प्रतिनिधीही सहभागी झाले होते. सर्वप्रथन सकाळी संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यापासून देशपांडे सभागृहापर्यंत रॅली काढण्यात आली.