काेराडी : वीज वसाहत परिसरातील साेपाेरेक्स काॅलनीत उजाड ठिकाणी सिमेंट ओट्यावर नवजात अर्भक आढळले. ही घटना मंगळवारी (दि.११) सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सकाळच्या सुमारास माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेच काेराडी पाेलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर अर्भक एक दिवसाचे असून, पाेलिसांनी त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. स्त्री लिंगी असलेल्या शिशूची प्रकृती चांगली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. वीज वसाहतीचा साेपाेरेक्स काॅलनीचा भाग निर्जन आहे. या ठिकाणी वसाहत नाही. या नवजात बालकाच्या निर्दयी मातापित्याचा शाेध घ्यावा, अशी मागणी विविध स्तरातून हाेत आहे. एखाद्या कुमारी मातेने किंवा मुलगी नकाे असलेल्यांनी त्याला इथे फेकून दिले असावे, असे तर्कवितर्क लावले जात आहे. याप्रकरणी पाेलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनात काेराडी पाेलीस तपास करीत आहेत.