लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वादग्रस्त नियुक्त्यांचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेल्यानंतर वनविकास महामंडळाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील ५ जणांची सेवा समाप्त केली असून, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी या पाच पदांवर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
महामंडळाचे वनविकास व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांच्या आदेशानुसार सहायक वनसंरक्षक विपुल गायकवाड यांना प्रकल्प अधिकारी, सहायक वनसंरक्षक कुणाल जयवंत बनकर यांना कंपनी सचिव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. सी. राखुंडे यांना जनरल क्युरेटर, लेखा सहायक एन. एम. बोरकर यांना लेखा सहायक आणि लिपिक व्ही. जी. थोरात यांना स्टोअर कीपर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या पाच जणांच्या नियुक्त्या केल्यानंतर त्यांच्या ठिकाणी वरिष्ठ पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करायला हवी होती, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर बाला यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
वादग्रस्त नियुक्त्यांवर 'लोकमत'ने टाकला होता प्रकाशगोरेवाडा प्राणिसंग्रहालयात वादग्रस्त नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त २०२४ मध्ये 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. त्यानंतर काही संघटनांनी गोरेवाडात महत्त्वाच्या पदांवर थेट स्थायी नोकरी दिल्याचे प्रकरण वरिष्ठ पातळीवर उचलून करण्यात आलेल्या नियुक्त्त्यांना विरोध दर्शविला होता. त्यानंतर याबाबत भारतीय जनता कामगार महासंघाचे सचिव सुनील गौतम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.