नागपूर : कोळसा उत्पादन वाढविण्यासाठी वेस्टर्न कोल फील्ड लि. (वकोलि) दर महिन्याला एक नवीन कोळसा खाण सुरू करणार असल्याचे केंद्रीय कोळसा खाण राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.गोयल यांच्या हस्ते रविवारी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोन कोळसा खाणींचे लोकार्पण तर पैनगंगा कोळसा खाणीचे उद््घाटन झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यानंतर गोयल नागपुरात आले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोळसा उत्पादनात वेकोलिच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत, कंपनीच्या कोळसा उत्पादनात नऊ महिन्यात १० ते १२ टक्के वाढ झाल्याचे तसेच तीन वर्षांनंतर प्रथमच कंपनी नफ्यात आल्याचे सांगितले. पाच वर्षांत ६० मि.टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वेकोलिने नियोजन केले आहे. त्यानुसार पुढच्या काळात दर महिन्याला वेकोलिची एक नवीन खाण सुरू होणार आहे, असे गोयल म्हणाले.वेकोलिच्या सामाजिक कामांचीही माहिती त्यांनी दिली. महाजेनकोच्या मदतीने कोराडीत २०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार असल्याचे गोयल म्हणाले. पत्रकार परिषदेला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,, कोल इंडियाचे अध्यक्षसुतीर्थ भट्टाचार्य, वेकोलिचे अध्यक्ष-प्रबंध निदेशक आर.आर. मिश्र व कंपनीचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोळसा उत्पादन वाढीसाठी दर महिन्याला नवीन खाणी
By admin | Updated: March 23, 2015 02:14 IST