लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ उपक्रमात वाढदिवसाच्या नावाखाली मेट्रो रेल्वे बुक करून त्यात हुल्लडबाजी करण्याच्या मुद्यावरून राजकारण पेटले आहे. भाजपकडून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. संबंधित प्रकार हा जाणूनबुजून करण्यात आला असून, नागपूर मेट्रोला व पर्यायाने शहराला बदनाम करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे षइयंत्र आहे, असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी लावला आहे.
नागपूर मेट्रोमुळे शहराची मान देशात उंचावली आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था संपली असून विकास प्रकल्प पूर्णत्वाकडे आहे. आघाडीच्या शासनाने कागदावरच विकास दाखविला होता आणि भाजप नेत्यांनी प्रत्यक्षात विकास घडवून दाखविला. नागपूरची प्रतिमा डागाळावी यासाठी मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर प्रशांत पवार यांच्यासारख्या लोकांनी मेट्रोमध्ये असे हिडीस प्रकार घडवून आणले. आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी खुलेआम जुगार खेळले, हिडीस नृत्यावर पैशाची उधळण करताना दिसून आले. मात्र तरीदेखील गृहमंत्र्यांनी मौन साधले आहे. एरवी लहानसहान गोष्टींवर सामान्यांवर कारवाईचा बडगा उचलणाऱ्या पोलिसांकडूनदेखील कुठलीही कारवाई झालेली नाही. हा गृहमंत्र्यांचादेखील जिल्हा असून असे प्रकार करणाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी खोपडे यांनी केली.