नागपूर : नक्षलींना एके-४७ रायफलच्या गोळ्या व स्फोटके पुरविण्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, सोमवारी दुसऱ्या क्रमांकाच्या आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. छन्नुलाल पांडुरंग शेंडे असे आरोपीचे नाव आहे. २१ जून २०१३ रोजी भामरागड पोलिसांनी आलापल्ली-धानोरा रोडवर स्फोटकांसह पकडलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेत चालक संजित दास व इतर आरोपींसह शेंडेही बसला होता. रुग्णवाहिकेत एके-४७ रायफलच्या १० गोळ्या, ४ डिटोनेटर, १ किलो जिलेटीन, ८ टारपॉलिन्स, ४० ताडपत्र्या व औषधीचे बॉक्स असा माल आढळून आला होता. चौकशीत, रुग्णवाहिका डॉ. रवींद्र करपे यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. करपे यांच्यानुसार २० जून रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य बंडोपंत मल्लेलवार यांनी फोन करून एका रुग्णासाठी हेमलकसा येथे रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले होते. यामुळे संजीव दासला रुग्णवाहिका घेऊन पाठविण्यात आले होते. मल्लेलवार यांच्या घरी सर्व विघातक वस्तूंचा साठा रुग्णवाहिकेत चढविण्यात आल्याचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
नक्षलींना स्फोटकांचा पुरवठा, हायकोर्टात आरोपीला जामीन
By admin | Updated: July 1, 2014 00:52 IST