कर्जाद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची लूट; बँक अधिकाऱ्यांचेही हितसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 10:42 AM2018-04-06T10:42:34+5:302018-04-06T10:44:18+5:30

दिवस-रात्र मेहनत करून बँकेत पैसा जमा करणाऱ्या खातेधारकांची रक्कम, बोगस दस्तऐवजाच्या आधारे एका टोळीच्या माध्यमातून कर्ज देऊन लुबाडली जात आहे.

Nationalized banks looted by loans; The interest of bank officials | कर्जाद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची लूट; बँक अधिकाऱ्यांचेही हितसंबंध

कर्जाद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची लूट; बँक अधिकाऱ्यांचेही हितसंबंध

Next
ठळक मुद्देबोगस दस्तऐवजाच्या आधारे वाहनांचे कर्ज वाटप

आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवस-रात्र मेहनत करून बँकेत पैसा जमा करणाऱ्या खातेधारकांची रक्कम, बोगस दस्तऐवजाच्या आधारे एका टोळीच्या माध्यमातून कर्ज देऊन लुबाडली जात आहे.  बऱ्याच प्रकरणांत अधिकाऱ्यांचे या टोळीसोबत हितसबंध असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ वर्षांत या टोळीने खासगी बँकेसोबतच अनेक राष्ट्रीयीकृत बँकांची लूट केली आहे. विशेष म्हणजे या टोळीने केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातील राष्ट्रीयीकृत बँकांनासुद्धा चुना लावला आहे.
लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार २०११ ते २०१६ दरम्यान या टोळीची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या मते अशा चार ते पाच टोळ्या सक्रिय आहेत. या टोळींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांचे वाहन कर्ज मिळविले आहे. बँकांनीसुद्धा कुठलीही चौकशी न करता कर्ज दिले आहे. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांवरसुद्धा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशाच काही घटना आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोळीचे सदस्य वाहन विक्रेता असल्याचे बोगस कागदपत्र तयार करून वाहनाच्या कर्जासाठी बँकेकडे अर्ज करतात. आयकर तसेच अन्य बोगस कागदपत्र जोडून कर्जही मिळवितात. मात्र कर्ज घेऊन बँकेचे कर्ज चुकवीत नाही. काही प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणात झटपट कर्ज मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना कमिशनसुद्धा देण्यात येते. गुन्हे शाखेने टोळींच्या काही सदस्यांसह अधिकाऱ्यांनासुद्धा अटक केली आहे.

बँकेच्या नवीन शाखेवर नजर
या टोळींची नजर ही शहरातील विविध परिसरात सुरू होणाऱ्या बँकेच्या नवीन शाखेवर असते. शाखा नवीन असल्याने त्यांना कर्जाची रक्कम सहज उपलब्ध होते. राष्ट्रीयीकृत बँकांच्या अशा अनेक शाखा आहेत, जिथे टोळीच्या सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी मिळून घोटाळे केले आणि बराच काळ याची माहिती लपवून ठेवली. मुख्यालयातून कर्ज वसुलीचा दबाव आल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेबरोबर शहरातील अनेक पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या.

आताही सुरू आहे लुबाडणूक
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार २०१६ नंतर प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पहिले बँक अधिकारी प्रकरण दाबतात. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आल्यानंतर पोलिसात तक्रार करतात. आताही अनेक बँकेत अशा घटना घडत आहेत.

अशी करतात लुबाडणूक
गुन्हे शाखेकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणात एक समानता आढळली आहे. टोळीचे सदस्य बँकेत स्वत:ला नामांकित कंपनीचा अधिकृत वाहन विक्रेता सांगतात. वाहन कर्जासाठी बँकेत अर्ज करतात. अर्जासोबत कर्जासाठी आवश्यक डीलरशिप, आयकर व अन्य बोगस कागदपत्रं जोडतात. त्यांना विनाचौकशी कर्जाची राशी उपलब्ध होते. कर्ज मिळाल्यानंतर ही टोळी वाहनांची खरेदीही करीत नाही आणि कर्जाचे हप्तेही भरत नाही. काही प्रकरणात असेही आढळले आहे की अधिकाऱ्यांनी मुद्दाम प्रकरणाची तक्रार केली नाही.

खापरखेड्यात समोर आले प्रकरण
नुकतीच खापरखेडा येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेत एका टोळीने या पद्धतीचा घोटाळा केल्याची घटना उजेडात आली आहे. टोळीने बँकेतून सहा वेगवेगळ्या नावाने ४५ लाखाचे वाहन कर्ज घेतले. या बँकेने सहा महिन्यानंतर या प्रकरणाची तक्रार दाखल केली. खापरखेडा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यात ताब्यात घेण्यात आलेल्या एका आरोपीने जमानतीसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु तो परत घेण्यात आला.

२४ तासाच्या आत कर्ज मंजूर
खापरखेड्यात समोर आलेल्या प्रकरणात पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांनी सांगितले की, आरोपीने सहा लोकांच्या नावावर कर्जासाठी अर्ज केले होते. अर्जासोबत बोगस कागदपत्र जोडले होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी न करता २४ तासात कर्ज मंजूर केले. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यानंतर स्पष्ट होईल, की बँकेच्या या घोटाळ्यात अधिकारी गुंतले आहे की नाही.

Web Title: Nationalized banks looted by loans; The interest of bank officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक