राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भावर फोकस : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील १८ दिवस विदर्भात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भावर विशेष फोकस केला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याची सुरुवात विदर्भातून केली जात आहे. उद्या, २८ जानेवारीपासून हा संवाद दौरा आयोजित करण्यात आला असून, याची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून होणार आहे. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे संपूर्ण विदर्भ पिंजून काढणार आहेत. तब्बल १८ दिवसाच्या या दौऱ्यात १४ जिल्हे, ८२ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता व महासचिव तसेच या दौऱ्याचे विदर्भाचे समन्वयक प्रवीण कुंटे (पाटील) यांनी बुधवारी पत्रपरिषदेत या दौऱ्याची माहिती दिली.
नागपूर जिल्ह्याचा दोन दिवस आढावा
या दौऱ्यात जयंत पाटील हे नागपूर जिल्ह्यात दोन दिवस आढावा घेतील. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस नागपूर जिल्ह्यातील पक्षाचा आढावा घेतला जाईल.