प्रशासकीय ‘लेटलतिफी’चा बसणार फटका :दोन दिवसांआधी पाठविले महाविद्यालयांना पत्रयोगेश पांडे नागपूरजिल्हाधिकारी कार्यालय तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘आॅनलाईन’चे वारे वाहत असले तरी प्रत्यक्ष प्रशासनामध्ये मात्र लेटलतिफी अजूनही कायम आहेच. २५ जानेवारी रोजी येणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या बाबतीत ही बाब दिसून आली आहे. या दिवसाच्या आयोजनासंदर्भात महाविद्यालयांना केवळ दोन दिवसांअगोदर पत्र पाठविण्यात आले आहे. बऱ्याच महाविद्यालयांना शनिवारी दुपारनंतर याची माहिती मिळाली असून सोमवारी हे आयोजन कसे करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. एकूणच विद्यापीठात लोकशाहीला बळकट करण्यासाठी मनविण्यात येणाऱ्या या दिवसानिमित्त केवळ औपचारिकताच पार पडणार असल्याचे चित्र आहे.मतदान ही लोकशाहीमधील महत्त्वाची प्रक्रिया आहे. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. युवापिढीमध्ये मतदानाचे महत्त्व जावे व त्यांच्यामध्ये जागृती व्हावी यासाठी राज्यभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना मुख्य निवडणूक आयुक्तांनी ६ नोव्हेंबर २०१५ रोजी केली होती. या पत्राच्या आधारावर राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी २ डिसेंबर २०१५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यासंदर्भात पत्र लिहिले. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु सुमारे दीड महिन्यानंतर म्हणजे १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून यासंदर्भात नागपूर विद्यापीठाला पत्र पाठविण्यात आले. यात संबंधित उपक्रमांसोबतच राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत महाविद्यालयांना निर्देश देण्याची सूचना होती. तसेच कार्यक्रमाच्या उपक्रमांसोबत छायाचित्र व व्हिडिओ चित्रीकरण पाठविण्याचेदेखील निर्देश देण्यात आले.हे पत्र प्राप्त झाल्यानंतर नागपूर विद्यापीठाने तत्काळ पावले न उचलता २२ जानेवारी रोजी महाविद्यालयांना निर्देश जारी केले व संकेतस्थळावर २३ जानेवारी रोजी हे पत्र ‘अपलोड’ करण्यात आले. २४ तारखेला रविवार येत आहे, त्यामुळे या उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयांना वेळच मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐनवेळी २५ तारखेला राष्ट्रीय मतदार दिवशी केवळ शपथ वाचण्याची औपचारिकता बहुतांश ठिकाणी पार पाडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व विद्यापीठाच्या या संथ कारभाराबाबत महाविद्यालयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)निर्देशानुसार आयोजित करावयाचे उपक्रम१८ वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे तसेच त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभागी वाढविणे हा याच्या मागे मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचावे यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये वादविवाद स्पर्धा, प्रारूप मतदान, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रम आयोजित करावे, असेदेखील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रात नमूद होते. ऐनवेळी या आयोजनाचे निर्देश का देण्यात आले, यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
राष्ट्रीय मतदार दिवस ठरणार केवळ औपचारिकता
By admin | Updated: January 24, 2016 02:55 IST