नागपूर : पळून जाण्यासाठी दुसऱ्या फळीतील एका नेत्याने मदत केल्याची खळबळजनक कबुलीवजा माहिती खुनाच्या आरोपींनी कोतवाली पोलिसांना दिल्याची चर्चा आहे. आरोपींनी ज्याचे नाव घेतले त्याच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई करावी, याबाबत पोलीस मंथन करीत आहेत. संग्राम बारमधील खूनप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आतापावेतो नितीन शिमले, आकाश तराळे, अभय नामदेव राऊत, अमोल माणिकराव जुनघरे आणि प्रशांत ऊर्फ बॉबी गजानन धोटे या आरोपींना अटक केली आहे. स्वप्नील साळुंके, सचिन राय, राहुल कार्लेवार आणि आकाश मिश्रा हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. अटकेतील आरोपींचा पीसीआर सुरू आहे. ९ जूनच्या रात्री १.४५ वाजताच्या सुमारास उपरोक्त आरोपींनी संग्राम बारमधील एका तरुणीला विशिष्ट गाण्याची फर्माईश केली. त्यावरून त्यांचे सुमित, रियाज आणि सलाम यांच्याशी भांडण सुरू झाले. ते विकोपाला पोहचले आणि आरोपींनी सुमित सुरेश तिवारी याचा शस्त्राने हल्ला करून तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला. मोहम्मद रियाज हक याच्याजवळील सोन्याची चेन आणि २५ हजार रुपये हिसकावून त्याला आणि मोहम्मद सलाम मोहम्मद सुफी यालाही गंभीर जखमी केले होते. खून केल्यानंतर आरोपींनी पळून जाण्यासाठी एमएच-३०-टी-६७८९ क्रमांकाची वर्ना सिल्व्हर कार वापरली. आरोपींना पळून जाण्यासाठी ही कार कुणी उपलब्ध करून दिली. त्यांना आर्थिक आणि ईतर मदत कुणी केली. फरार आरोपी कुठे दडून बसले, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. खून करून बाहेर पडल्यानंतर आरोपींना एका दुसऱ्या फळीतील नेत्याने पळून जाण्यासाठी मदत केली, अशी जोरदार चर्चा परिसरात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याचे नाव आरोपीने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याची एकूणच पाश्वभूमी बघता पोलीस त्याच्यावर कारवाई कशा स्वरूपाची करावी, त्याबाबत विचारविमर्श करीत असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
आरोपींनी सांगितली मदत करणाऱ्यांची नावे ?
By admin | Updated: June 21, 2014 02:40 IST