नागपूरच्या वाठोड्यातील हत्याकांडाचा उलगडा : सराईत गुन्हेगारांनी केला घात , मृत होता सरकारी अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 09:19 PM2019-10-12T21:19:51+5:302019-10-12T21:20:43+5:30

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडाचा २४ तासात छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. वाठोड्यातील अवैध दारूच्या भट्टीवर झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगारांनी हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले.

Nagpur's Wathoda massacre revealed:Murder by notorious criminals | नागपूरच्या वाठोड्यातील हत्याकांडाचा उलगडा : सराईत गुन्हेगारांनी केला घात , मृत होता सरकारी अधिकारी

नागपूरच्या वाठोड्यातील हत्याकांडाचा उलगडा : सराईत गुन्हेगारांनी केला घात , मृत होता सरकारी अधिकारी

Next
ठळक मुद्देदारूच्या भट्टीवरील किरकोळ वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या हत्याकांडाचा २४ तासात छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. वाठोड्यातील अवैध दारूच्या भट्टीवर झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगारांनी हे निर्घृण हत्याकांड घडवून आणले. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीडगाव आऊटर रिंगरोड, आराधनानगरच्या पांदण रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी या भागात खळबळ उडाली होती. एका व्यक्तीने नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती कळविली. नियंत्रण कक्षाने वाठोडा पोलिसांना सांगताच वाठोडा पोलिसांसह गुन्हे शाखेचाही ताफा तेथे पोहचला. मृताच्या डोक्यावर, कपाळावर लोखंडी पाईपने फटके मारून त्याची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. मृताची ओळख पटविण्यासाठी वाठोडा पोलिसांनी आजूबाजूच्यांना विचारणा केली; मात्र त्याची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या समांतर तपासात मृत व्यक्तीकडे ओळखपत्र सापडले. त्यावरून त्याचे नाव नरेंद्र गोपीचंद बोरकर (वय ४०, रा. गरोबा मैदानाजवळ, लकडगंज) असल्याचे आणि तो जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचा कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. हा धागा धरून गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले. शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर धावपळ करून पोलिसांनी या हत्याकांडातील आठ आरोपी ताब्यात घेतले. त्यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत. तर बादल राजू ढवरे (वय १९, भांडेवाडी, कळमना), मयूर मुनेश्वर नागदेवे (वय १८, रा. भांडेवाडी), फिरोज शमशाद अन्सारी (वय १९, रा. अंबेनगर पारडी) आणि संदीप विजयकुमार शाहू ( वय २०, रा. भांडेवाडी रेल्वेस्टेशनजवळ, पारडी), अशी अन्य चौघांची नावे आहेत. आठही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन घटनाक्रम सांगितला.
आधी बेशुद्ध केले, नंतर ठार मारले
गुरुवारी रात्री १० च्या सुमारास बोरकर वाठोड्यातील एका दारूच्या भट्टीवर दारू प्यायला गेला होता. तेथे आरोपीही दारू प्यायला आले. एकाला बोरकरचा धक्का लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तेथे कसेबसे निपटल्यानंतर आरोपींनी बोरकरला अंधाऱ्या ठिकाणाहून उचलले आणि घटनास्थळाजवळ नेले.
तेथे आरोपींनी बोरकरला मारहाण करून त्याला लुटण्याच्या उद्देशाने त्याला रोख आणि एटीएम कार्ड मागितले. बोरकरने विरोध करताच आरोपीने त्याच्या डोक्यावर रॉडचा फटका हाणला. तो बेशुद्ध होऊन खाली पडला. आरोपींनी त्याच्या कपड्याच्या खिशातून पैसे, मोबाईल आणि कागदपत्रे काढून घेतली. काही वेळेनंतर बोरकरला शुद्ध आल्याने तो हालचाल करू लागल्याचे पाहून आरोपींनी त्याच्या डोक्यावर, कपाळावर पुन्हा रॉडचे फटके मारून त्याला ठार मारले आणि तेथून पळून गेले. शुक्रवारी दिवसभर काही घडलेच नाही अशा आविर्भावात सर्व आरोपी फिरत होते. पोलिसांनी मात्र त्यांना हुडकून काढले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार तसेच किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे, उपनिरीक्षक राजकुमार त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली. आरोपींना पुढील कारवाईसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
लुटमारीचे अनेक गुन्हे!
आरोपींचा हा पहिला गुन्हा नाही. त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी कळमन्यातील श्यामनगरातून एक ऑटो चोरला. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्य प्रदेश बसस्थानकाजवळ दारूच्या नशेत दोन व्यक्तींना लुटले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रकचालकाला लुटले तर, गुरुवारी किरकोळ वादातून बोरकरची हत्या केली. मात्र, गुन्हे शाखेच्या घरफोडी प्रतिबंधक पथकाचे निरीक्षक भीमराव खंदाळे आणि पोलीस नायक पंकज लांडे यांनी आपल्या खबऱ्याचा वापर करून गुन्हा घडल्याच्या २४ तासात आरोपींना शोधून त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी बजावली. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी या पथकाचे या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.

 

Web Title: Nagpur's Wathoda massacre revealed:Murder by notorious criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.