उपराजधानीतील तरुणाईला नशेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:38 AM2019-07-26T11:38:56+5:302019-07-26T11:40:47+5:30

नागपुरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजा, हुक्कापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस तरुणाई भोवती घट्ट होत असल्याचे चित्र आहे.

Nagpur youth is addicted to drugs | उपराजधानीतील तरुणाईला नशेचा विळखा

उपराजधानीतील तरुणाईला नशेचा विळखा

googlenewsNext
ठळक मुद्देसहज मिळतात अमली पदार्थ औषधांच्या स्वरूपातील सेवनाचेही आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संगत म्हणा किंवा केवळ उत्सुकतेतून केलेला प्रयोग म्हणा, अमली पदार्थाची चव चाखणारे पुढे या गर्तेत आपसूकच सापडतात. हळूहळू जेव्हा याचे सेवन वाढते तेव्हा ते कधी अडकले हे त्यांनाही कळत नाही. नागपुरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजा, हुक्कापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस तरुणाई भोवती घट्ट होत असल्याचे चित्र आहे.
हल्ली तरुणींमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. आजवर उघडकीस आलेल्या ‘रेव्ह’ पार्ट्यांमधून हे स्पष्ट झाले आहे. पाश्चात्त्य जीवनशैलीचा वाढता प्रभाव आणि ‘एन्जॉयमेंट’च्या चुकीच्या कल्पना ही यामागील प्रमुख कारणे आहेत. बदलेली जीवनशैलीही याला बरीच जबाबदार आहे. यात आई-वडील बाहेर आपल्या नोकरीमध्ये तर घरी मोबाईलमध्ये गुंतून राहत असल्याने त्यांच्यात आणि मुलांमध्ये संवाद दुर्मिळ होत चालला आहे. आपली मुले काय करतात, ती कुणाच्या संगतीत आहेत याची बहुतांश पालकांना कल्पना नसते. त्यांचे केवळ मुलांना ‘पॉकेटमनी’ पुरविण्याएवढेच लक्ष असते. अशी मुले एकलकोंडी बनण्याची आणि व्यसनांकडे वळण्याची शक्यता वाढते. यात सहज मिळणारे अमली पदार्थ व्यसनात ओढण्यास मदत करीत असल्याचे वास्तववादी चित्र आहे.

औषधांची नशा
सध्याच्या काळात तरुणाईचा ओढा ‘परंपरागत’ अमली पदार्थाची नशा करण्याऐवजी औषधांची नशा करण्याकरिता वाढत आहे. यातूनच केटामाईन, कोडीन, अल्फ्राझोलम, मेफेड्रिन, इफेड्रिन इत्यादी औषधांच्या स्वरूपातील अमली पदार्थांच्या सेवनाकडे तरुणाई आकर्षित होत आहे. विशेष म्हणजे, या व्यसनाला तरुणीही बळी पडल्याचे चित्र आहे. बदलती लाईफस्टाइल, फॅशन स्टेटमेंट म्हणून ड्रग माफियांनीही थेट औषधांच्या प्रक्रिया न केलेल्या कच्च्यामालाचे अमली पदार्थ म्हणून पुरवठा करण्यास सुरुवात केल्याचे वास्तव आहे. गुन्हेशाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने दोन वर्षांत ४०७ अमली पदार्थ तस्करांना अटक करून तब्बल साडे चार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले. अटकेतील तस्करांमध्ये ४९ मुख्य तस्करांचाही समावेश आहे. यात ४० गांजाप्रकरणात १ कोटी २० लाखांचा गांजा, १६ लाखांचे कोकेन, ४ लाख ३५ हजार रुपये किमतीची गर्द, पाच लाखांची चरस जप्त करण्यात आली. या प्रकरणांत पोलिसांनी १९७ आरोपींना अटक केली.

गांजा विक्रीचे अड्डे
मध्यवर्ती संग्रहालयाच्या संरक्षण भिंतीच्या कोपºयात एकमेकांना ‘सुट्टा’ देत घोळक्याने तरुण नशा करताना नेहमीच दिसून येतात. हा परिसर गांजा विक्रीचे केंद्र असल्याचे म्हटले जाते. या शिवाय मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, सेमिनरी हिल्स परिसर, महाल, किल्ला परिसर, आयचित मंदिर परिसर, मोमीनपुरा परिसर, गरोबा मैदानाचा भाग, बगडगंज परिसर, अजनी परिसर, मेडिकल चौक, मानेवाडा रोड परिसर अशा अनेक ठिकाणी छुप्यापद्धतीने विक्री होते. २५ रुपयांच्या पुडीपासून ते ५०० रुपयांपर्यंतचे पॅकेट उपलब्ध केले जाते.

तरुणांमध्ये गांजाचे व्यसन : कोणत्याही अमली पदार्थाच्या सेवनामुळे त्या व्यक्तीमध्ये व्यसनासक्ती निर्माण होते. ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या अमली पदार्थाच्या मात्रेवर (डोस) अवलंबून राहते. सध्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रौढांच्या तुलनेत १६ वर्षांवरील मुले मोठ्या संख्येत उपचारासाठी येत आहेत. अल्कोहल व्यसनासोबतच या तरुणांमध्ये गांजाच्या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. धूम्रपान आणि हुक्का पिण्याच्या व्यसनाच्या विळख्यात आता मुलीही अडकत चालल्या आहेत.
- डॉ. शिवराज देशमुख, प्रकल्प संचालक,
सत्यनारायण नुवाल गुरुकूल व्यसन मुक्ती व उपचार केंद्र

Web Title: Nagpur youth is addicted to drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.