शुभांगी काळमेघ नागपूर : नागपूरची एक ३६ वर्षीय महिला कारगिलमधील एलओसीजवळच्या हंजारबान गावातून अचानक बेपत्ता झाली आहे. ती आपल्या १५ वर्षांच्या मुलासह कारगिलमध्ये आली होती. मुलाला हॉटेलमध्ये एकटे सोडून ती गावात गेली आणि रात्र होऊनही परत आली नाही.
ही घटना १४ मे रोजी घडली. ही महिला ९ मे रोजी आपल्या मुलासह एका हॉटेलमध्ये थांबली होती. १४ मे रोजी ती हंजारबान गावात गेली, पण परतली नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली.
पोलिसांनी मुलाची चौकशी केल्यावर कळले की ते दोघं पंजाबमधून प्रवास करत कारगिलला आले होते. महिला तिच्या पतीपासून काही वर्षांपूर्वी वेगळी राहत होती. तीने यापूर्वी नागपूर आणि मुंबईतील रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून काम केले आणि आता ती टेलरिंगचा व्यवसाय करत होती.
महिलेच्या मुलाला सध्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून तो सुरक्षित आहे. त्याची मानसिक अवस्था लक्षात घेता त्याला फार विचारण्यात आलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, महिलेबद्दल कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.